सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे-कोपरा येथील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनाची रात्रीच्या वेळेत कत्तल सुरू असल्याची बाब लोकसत्ताने २९ नोव्हेंबर रोजी उजेडात आणली होती. या प्रकरणाचे छायाचित्रासह वृत प्रसिद्ध झाल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना अखेर जाग आली असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महामार्गालगत असलेल्या कांदळवने क्रेनच्या साह्य़ाने नष्ट करण्याचे काम सुरू होते. शासकीय कार्यालयाला सुट्टी असल्याचा मुहूर्तसाधत अंधारात हे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र लोकसत्ताच्या छायाचित्रकाराच्या कॅमेरामध्ये हा प्रकार कैद झाल्याने हे बिंग फुटले. त्याच वेळी सायन पनवेल मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने हे आपले कृत्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु ही कत्तल करून कोणाचा फायदा होणार याचा मागोवा कामोठे पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी दिली. पोलिसांनी हा प्रकार समजल्यानंतर वन विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र सरकारी हद्दी व कार्यक्षेत्राचा वाद पुढे सारत या विभागाने जेथे ही कत्तल घडली तो परिसर महसूल विभागाचा असल्याचे सांगून आपले हात वरती केले आहेत. पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर पनवेलच्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संतोष पाटील यांनी याप्रकरणी पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये या गुन्ह्य़ाची तक्रार पोलिसांत दिली आहे.
या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या सायन पनवेल टोलवेज कंपनीने त्याच वेळी या मार्गावरील आपले काम बंद असून या कांदळवनांच्या कत्तलीशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या मार्गावरील कांदळवनांच्या कत्तलीबाबत ग्रीन ट्रीब्युनल व उच्च न्यायालयात विचारणा झाली होती. मात्र संबंधित कंपनीने आपण कायदेशीर परवानगी घेऊनच काम करतो, असे न्यायालयात सिद्ध केल्याने २९ नोव्हेंबर रोजीची कामोठे येथील अंधारातील कांदळवनाच्या कत्तलीचे रहस्य अजून वाढले आहे. महामार्गावरील कामोठे येथे जेसीबी, डंपर व मजूर एवढा लवाजमा घेऊन रात्रीच्या अंधारात कांदळवनाची कत्तल कोणी केली. ही कांदळवने कोणाला नकोशी होती. त्यापासून नेमका कोणाला फायदा होणार आहे याची पडताळणी सुरू आहे. पोलिसांच्या तपासात या कांदळवनाच्या कत्तलीत नेमकी कोणाची किती पाळेमुळे रुतली आहेत याचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ दोनचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली आहे.