उपनगरीय लोकल गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आता महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम पश्चिम रेल्वेवर जोमाने सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये सध्या लोकल गाडय़ांमधील महिलांच्या डब्यात हे कॅमेरे बसवले जात आहेत. प्रत्येक गाडीतील महिलांच्या डब्यात बसणाऱ्या या कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण थेट रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षातून पाहता येणार आहे. हे कॅमेरे २६ मे ते ९ जून यांदरम्यान होणाऱ्या प्रवासी व ग्राहक सुविधा पंधरवडय़ादरम्यान सेवेत येण्याची शक्यता आहे.
लोकलच्या महिला डब्यांमध्ये शिरून महिलांवर हल्ले होण्याच्या, त्यांच्यासह जबरदस्ती करण्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत नोंदवल्या गेल्या होत्या. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा विचार करून महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत, अशी भूमिका मध्य व पश्चिम रेल्वेने घेतली.
त्यानुसार आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐहोरी ग्रुप्स कंपनीचे हे कॅमेरे महिला डब्यांमध्ये बसवण्याचे काम सध्या मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये सुरू आहे. १२ डब्यांच्या प्रत्येक गाडीत असे १८ ते २१ कॅमेरे असतील. हे कॅमेरे ९० अंशांत फिरणार आहेत. या कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण ३-जी इंटरनेच्या माध्यमातून थेट रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षात पाहता येणार आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या बाबतीत काहीही प्रकार घडल्यास थेट रेल्वे सुरक्षा दलाला त्याची माहिती मिळेल.
प्रवासी सुविधा पंधरवडय़ात लोकार्पणाचा प्रयत्न
महिलांच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर असे कॅमेरे असलेल्या एका उपनगरीय गाडीचे लोकार्पण २६ मे ते ९ जून रोजी रेल्वेवर साजऱ्या होणाऱ्या प्रवासी व ग्राहक सुविधा पंधरवडय़ादरम्यान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    – ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद,
    महाव्यवस्थापक (पश्चिम रेल्वे)