लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात गुरुवारी ठाणे जिल्ह्य़ात होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही संवेदनशील केंद्रांवर यंदा सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. जिल्ह्य़ातील चार मतदार संघांमध्ये एकूण ७२ लाखांहून अधिक मतदार आहेत. यंदा सर्वत्र मतदानाची वाढलेली टक्केवारी लक्षात घेता ठाणे जिल्ह्य़ातही सरासरी साठ टक्के मतदान होऊन तब्बल पन्नास लाख नागरिक मतदानाचा हक्क बजावतील, असा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघात एकूण आठ हजार ४८ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी तब्बल ४६ हजार ७८२ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या चारपैकी पालघरचा अपवाद वगळता उर्वरित ठाणे, कल्याण तसेच भिवंडी या तिन्ही जागा महायुती तसेच काँग्रेस आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता डोळ्यात तेल घालून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला असल्याचे समजते. त्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेरा, मायक्रो ऑब्जझव्हर्स अथवा वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस यंत्रणेच्या मदतीने सध्या संवेदनशील मतदार केंद्र ठरविण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या दोन दिवसांत ती यादी जाहीर केली जाणार आहे.
संवेदनशीलतेचे निकष
गेल्या निवडणुकीत हाणामारी अथवा दमदाटीचे प्रकार घडलेले, एकाच उमेदवारास ९० टक्क्य़ांहून अधिक मतदान झालेले केंद्र संवेदनशील ठरविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दाटीवाटीच्या क्षेत्रात असलेली मतदान केंद्रही संवेदनशील ठरवून त्यांच्यावर लक्ष दिले जाणार आहे.