झिम्मा, फुगडी या पारंपरिक खेळातून उतरत्या वयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाचे प्रदर्शन ज्येष्ठ नागरिकांनी चर्नी रोड येथे श्रावण साजरा केला. हेल्पेज इंडियातर्फेनाना नानी स्कूलच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ६५ वर्षांपुढील महिला आणि पुरुषांबरोबरच तरुण मुलेमुलीही सहभागी झाल्या होत्या झिम्मा, फुगडी यांबरोबरच संगीताची मैफल जमवत ज्येष्ठ नागरिकांनी ‘हम किसी से कम नही’ असल्याचे दाखवून दिले. तरुणांना आपल्या परंपरेची व संस्कृतीची करून देणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले. बोरगावकर यांनी कार्यक्रमाची सूत्रेही सांभाळली.
‘श्रावण’ हा विषय मध्यवर्ती ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यात त्यांची नातवंडेही सहभागी झाली होती. यात नातवंडे आपल्या संस्कृतीविषयी आपल्या आजी-आजोबांना प्रश्न विचारत होते. तर त्यांचे आजी-आजोबा त्याचे सांस्कृतिक, सामाजिक, वैज्ञानिक महत्त्व विषद करीत होते. या महिलांनी मंगळागौरीची गाणीही सादर केली. तसेच, त्यावर झिम्मा-फुगडीही घालून दाखविली. महिलांचा हा उत्साह वाखाणण्याजोगा होता.