मतदान यंत्राची सुरू झालेली टिकटिक.. फेरीगणिक वाढत चाललेली उत्सुकता.. ध्वनीक्षेपकातून जाहीर होणाऱ्या फेरीनिहाय निकालाकडे कान लावून बसलेले कार्यकर्ते.. या निकालामुळे कुठे जल्लोष तर कुठे दिसणारी चिडीचुप शांतता.. मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळताना राज्यभरातील निकालाचा आढावा घेणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी.. अंतिम निकालाची घोषणा झाल्यावर ठिकठिकाणी गुलाल उधळून व फटाके फोडून झालेला जल्लोष..
नाशिक जिल्ह्यत रविवारी १५ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीवेळी हे चित्र पहावयास मिळाले. सकाळी आठ वाजता मतदारसंघनिहाय  मतमोजणीला कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. काही प्रमुख उमेदवार आपल्या प्रतिनिधींसोबत मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले होते. मतमोजणी केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. नाशिक शहरात पाच मतदारसंघांची मतमोजणी झाली. त्यात नाशिक पूर्व आणि पश्चिम मतदारसंघाची अंबड औद्योगिक वसाहतीतील अन्न महामंडळाच्या गोदामात, देवळालीची पंचवटीतील महापालिकेचे कार्यालय, इगतपुरीचे शासकीय कन्या विद्यालयात यांचा समावेश होता. मतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सभोवतालच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्यांवर लोखंडी अडथळे उभारून आतील परिसरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही याची व्यवस्था पोलीस यंत्रणेने केली होती. या परिघाबाहेर पदाधिकाऱ्यांसमवेत कार्यकर्त्यांनी निकाल जाणून घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरूवात केली. निवडणुकीत आपलाच विजय असा दावा करणारे काही उमेदवार मात्र मतमोजणी कक्षाकडे फिरकले नाहीत.
मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अध्र्या तासात फेरीनिहाय निकाल जाहीर होऊ लागले. या निकालातून निकालाचे चित्र जसे स्पष्ट होऊ लागले, तसतसे विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला तर दुसरीकडे पिछाडीवर पडलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते हळूहळू काढता पाय घेऊ लागले. मागील निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघात मनसेने जोरदार मुसंडी मारली होती. यंदा निकालाची आकडेवारी जाहीर होऊ लागल्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट होऊ लागल्यावर सेना, मनसे, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली. मतमोजणीसाठी प्रतिनिधी म्हणून आलेल्यांनी नंतर केंद्रातून काढता पाय घेतला. अनेक उमेदवार मतमोजणी केंद्राकडे फिरकलेही नाहीत. भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्यावर त्यांनी समाधान मानले. पिछाडीवर पडलेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ही अवस्था असताना दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सुरू झाला होता. ध्वनीक्षेपकावरून जसजशी आकडेवारी जाहीर होत होती, तसतसे त्यांचा उत्साह दुणावत होता. गुलाल उधळत व फटाके फोडून ते आनंद व्यक्त करत होते.
दुपारी बारा वाजेपर्यंत काही मतदारसंघांचे निकाल जाहीर झाले तर काही जागांचा निकालाचा कल स्पष्ट झाला. यामुळे मतमोजणी केंद्राप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यालयात चिंतेचे मळम दाटले. मनसे, राष्ट्रवादी, सेना व काँग्रसच्या कार्यालयात बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते टीव्हीवरील निकाल पाहण्यात दंग होते.
नाशिक मध्य मधून मनसेचे वसंत गीते हे पिछाडीवर पडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई नाका येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. दुसरीकडे, सिडको भागातही सेना, मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे पानिपत झाल्यामुळे तणावपूर्ण शांतता होती.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने स्थितीवर नजर ठेवली. राज्यात भाजपला मिळालेले लक्षणिय यश आणि पक्षाच्या स्थानिक उमेदवारांचा विजय यांचा एकत्रित आनंद स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत
साजरा केला.
वाहनधारक व नागरिकांची दमछाक
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमुळे शहरातील अनेक भागात मतमोजणी केंद्राच्या सभोवतालच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारकांना सहन करावा लागला. रविवार हा सुटीचा दिवस. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. मतमोजणीमुळे गडकरी चौक ते त्र्यंबक नाका, मेहेर सिग्नल ते सीबीएस यासह हनुमान वाडी, अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस सभोवतालचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्याबाबतची कल्पना आधीच यंत्रणेने दिली होती. मात्र दिवाळीची बाजारहाट तसेच अन्य कारणास्तव बाहेर पडलेल्या नागरिकांना या अडथळ्यांना सामोरे जावे लागले. ठिकठिकाणी पोलिसांनी त्यांना हटकल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करणे त्यांना भाग पडले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पादचारी तसेच वाहनधारकांची दमछाक झाली. अंबड औद्योगिक वसाहतीत तर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही पोलिसांनी प्रवेश दिला नाही. या कारणावरून कामगार व पोलिसांचे शाब्दीक वादही झाले.