पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता अभियानाच्या आदेशानंतर मध्य रेल्वेने कंबर कसली असून २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या अभियानासाठी विविध पद्धतीने तयारी सुरू केली आहे. रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांच्यासह अनेक नागरिक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यात श्रमदान करणार असून या साफसफाई मोहिमेला यंत्रांचीही जोड देण्यात येणार आहे. त्यासाठी लोहमार्ग साफ करणारे ‘ट्रॅक क्लिनिंग मशीन’ खास दिल्लीहून मागवण्यात आले आहे. हे यंत्र दादर स्थानकातील रुळांची स्वच्छता करणार आहे.
रेल्वे स्थानक आणि परिसर या दोहोंवर एक कळकट छाप पसरली असते. त्यातही रेल्वेचे रूळ आणि रेल्वेमार्ग अतिशय अस्वच्छ असतात. गाडीत बसून किंवा फलाटावर उभे राहून रूळांवर कचरा फेकणाऱ्यांची संख्या मुंबईत कित्येक लाखांच्या घरात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील शौचकूप वापरणाऱ्या लोकांमार्फतही रूळांवर घाण पसरत असते. बऱ्याचदा उरलेले अन्नपदार्थही याच रूळांवर फेकले जातात. त्यामुळे फलाट परिसरात रूळांवर मोठय़ा संख्येने बागडणारे उंदीरही दृष्टीस पडतात. हे चित्र या यंत्राच्या साह्याने पालटण्याचा रेल्वे अधिकाऱ्यांचा निर्धार आहे. याचबरोबर वर्षभरात १०० तास आणि आठवडय़ात दोन तास स्वच्छतेसाठी श्रमदान करावे, अशी शपथही रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी यांना देण्यात आली आहे.
लोहमार्गाच्या स्वच्छतेसाठी असेच एक मशीन १९९०च्या दशकात रेल्वेमध्ये वापरले गेले होते. मात्र या यंत्राद्वारे कचऱ्याबरोबरच लोहमार्गाखाली पसरलेली खडीही उचलली जात असल्याने त्याचा वापर थांबविण्यात आला होता. आता या यंत्रामध्ये सुधारणा करून ते नव्याने वापरात आणले आहे. त्याची पूर्वतपासणी झाली नसली तरी आधीच्या यंत्रातले दोष दूर करून ते बनविल्याने ते उपयुक्तच ठरेल, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

संस्था, विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग
मुंबईतील अनेक सेवाभावी संस्था आणि महाविद्यालयांतील विद्यार्थीही या मोहिमेत श्रमदान करणार आहेत. संस्थांचे कार्यकर्ते जवळच्या स्थानकांवर जाऊन फलाट व पादचारी पुलांच्या स्वच्छतेसाठी झटतील. रेल्वे स्थानकाचा वापर प्रवासीच जास्त करतात. त्यामुळे स्थानक स्वच्छ ठेवणे ही त्यांचीही जबाबदारी आहे. या भावनेतूनच या संस्था पुढे आल्या आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. याचबरोबरच रामनारायण रूईया महाविद्यालय, महर्षी दयानंद महाविद्यालय अशा काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही श्रमदानात स्वारस्य दाखवले आहे. त्याशिवाय ठाण्यापुढील स्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रवासी संघटना पुढे सरसावल्या आहेत.

स्थानक         संस्था
सीएसटी    ग्रीनपीस व ओआरएफ
परळ         युअर इंडिया आणि तेजज्ञान
दादर         मानव सेवा संघ आणि तेजज्ञान
कुर्ला         हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी
घाटकोपर   लायन्स क्लब ऑफ घाटकोपर
विक्रोळी    ग्रीनपीस
मुलुंड        लायन्स क्लब ऑफ मुलुंड