गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने या मार्गावर एक वातानुकूलित प्रीमियम गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी मुंबई-कोकण-मुंबई अशा सहा फेऱ्या करणार असून अद्यापही आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
०२०४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही वातानुकुलित प्रीमियम साप्ताहिक गाडी २८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री ०१.१० वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता करमाळीला पोहोचेल. तर ०२०४६ करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी याच तीन दिवशी सकाळी ११.५५ वाजता करमाळीहून रवाना होऊन लोकमान्य टिळक टर्मिनस येथे रात्री १०.१५ वाजता पोहोचेल. या गाडीत वातानुकुलित प्रथम दर्जाचा एक डबा, वातानुकुलित द्वितीय श्रेणीचे तीन डबे आणि वातानुकुलित तृतीय श्रेणीचे आठ डबे असतील. त्याशिवाय खानपान सेवेसाठीही एक डबा असेल. ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ याच स्थानकांवर थांबेल. गाडीचे आरक्षण फक्त ऑनलाइनच होणार आहे. आरक्षणाची तारीख मध्य रेल्वेतर्फे नंतर घोषित केली जाईल.