केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला अभिमान वाटावा असा ‘यशस्वी भव’ सारखा शैक्षणिक उपक्रम दैनिक लोकसत्ता गेली १५ वष्रे सातत्याने राबवित आहे. भविष्यातील देश ज्यांच्या हाती असेल अशी पुढील पिढी घडविणाऱ्या या सामाजिक बांधिलकीच्या प्रयत्नात आपलाही सहभाग असावा म्हणून सेंट्रल बँकेने ‘यशस्वी भव’करिता योगदान दिल्याचे सेंट्रल बँकेचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे यांनी प्रतिपादन केले.  सेंट्रल बँकेने ठाणे जिल्ह्यातील मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘लोकसत्ता यशस्वी भव’ योजनेतून मार्गदर्शनाचा मार्ग दाखवला आहे. बँकेचे अध्यक्ष एम. व्ही. टांकसाळे यांनी व्यक्तिश शैक्षणिक योजनेमध्ये रस दाखवून बँकेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका देण्याच्या सूचना केल्या. प्रबंध सरव्यवस्थापक अनिलकुमार खडके व ठाणे विभागीय सहाय्यक सरव्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी ‘यशस्वी भव’ योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सेंट्रल बँकेच्या ठाणे विभागीय कार्यालयातर्फे ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, येथील मराठी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी भव योजनेचा लाभ होणार आहे.