गुन्हेवृत्त
ठाणे, कल्याण परिसरात गुरुवारी एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या सात घटना घडल्या असून या घटनांमुळे शहरात सोनसाखळी चोर पुन्हा सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना ठेंगा दाखवत सोनसाखळी चोरांचे उपद्रव वाढल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
महात्मा फुलेनगर परिसरात राहणाऱ्या श्वेता शशांक सावंत (२६) या गुरुवारी सावरकरनगर येथील राजपूत मोटार ट्रेनिंग स्कूलजवळून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील एक लाखाचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. किसननगर भागात राहणाऱ्या नम्रता उमेश कदम या गुरुवारी श्रीनगर येथील परमार्थ निकेतन येथून पायी जात होत्या. त्या वेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या पाठीवर थाप मारून १५ हजारांची सोनसाखळी खेचून नेली. कल्याण येथील आग्रारोड भागातील मल्हार संकुलात संगीता राजेंद्र पाटील (४०) राहत असून गुरुवारी सायंकाळी त्या मेघमल्हार स्कूलच्या गेटजवळील रस्त्यावरून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या चोराने त्यांच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि त्यांच्या गळ्यातील एक लाख ८० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. तसेच कल्याणमध्ये खडकपाडा परिसरात राहणाऱ्या रुपाली शिरसाट पोतदार हायस्कूलजवळून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.
ठाणे येथील कशिशपार्क परिसरात राहणाऱ्या सुमन माने यांचे मंगळसूत्र व सोन्याचा हार असा एक लाख १० हजारांचा ऐवज सोनसाखळी चोरांनी खेचून नेला. वर्तकनगर परिसरात कविता बोरकर यांचे एक लाखांचे मंगळसूत्र चोरटय़ांनी खेचून नेले.
सुर्वेवाडी परिसरात रुपाली गळवे यांच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र खेचल्याची घटना घडली. समतानगर परिसरात जयश्री कहडणे यांच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र खेचल्याचा प्रकार घडला.