ठाणे – येथील खोपट भागातील जयराम सोसायटीत राहणारी ४८ वर्षीय महिला बुधवारी सकाळी सोसायटीच्या गेटजवळून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नौपाडा येथील पाचपाखाडी भागातील दांडेकर दत्तछाया सोसायटीत राहणारी ६५ वर्षीय महिला या राममारुती रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचे दागिने खेचले. त्याचप्रमाणे याच भागात दमाणी इस्टेट परिसरात रहाणाऱ्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे दागिने खेचल्याची घटना घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पश्चिमेतील डवलेनगर पाडा भागातील कृष्णा कोयना इमारतीमध्ये राहणारी ४० वर्षीय महिला येऊर गेटसमोरुन जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.