येवला, इगतपुरी, सिन्नर तालुक्यांमध्ये दोन दिवसात १० ते १२ ठिकाणी घरफोडी आणि दरोडय़ाचे प्रकार घडल्याने ग्रामीण पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. यंदा दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर गुन्हेगारीमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त होत असून शिवार वस्त्यांवर राहणाऱ्या कुटूंबांना दरोडेखोर आपले लक्ष्य करीत आहेत. तर, घरफोडीसारखे प्रकार शहरांमध्ये होऊ लागले आहेत. पोलिसांनी शेतांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असले तरी दरोडे रोखण्यासाठी विशेष गस्तीपथक तयार करण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे.
पाऊस सुरू झाल्यावर वस्त्यांवर राहणाऱ्यांचा रात्रीच्या वेळेस गावाशी फारसा संपर्क राहात नाही. त्यातच रात्रीचे भारनियमन किंवा पावसामुळे गायब होणारी वीज, पावसामुळे नेहमीपेक्षा लवकर निद्राधीन होणारे शेतकरी या गोष्टी दरोडेखोरांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री अंदरसूल, धामणगाव या येवला तालुक्यातील गावांमध्ये चार ठिकाणी दरोडे पडले. तर, सिन्नरमधील दापूर येथे रात्रीतून चार ठिकाणी घरफोडी झाली. याच्या एक दिवस आधी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथेही रात्रीतून तीन ठिकाणी घरफोडी झाली. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अशा घटनांमध्ये वाढ होईल याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी हे प्रकार रोखण्यासाठी आधीच उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. परंतु तसे काहीही दिसून आले नाही. या दिवसांमध्ये वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना दरोडा किंवा चोरीचा अधिक धोका असतो. ग्रामीण भागात गावापासून कित्येक किलोमीटर दूरवर शेती राहात असल्याने दररोज ये-जा करणे शक्य होत नसल्याने बहुतेकांनी शेतातच राहाणे पसंत केले आहे. त्यातच वीज कधी गायब होईल आणि कधी येईल याचा कोणताही भरवसा नसल्याने शेतात राहिल्यास जेव्हा वीज येईल तेव्हा पंप सुरू करून पिकांना पाणी देता येणे शक्य होते. अलीकडील काळात शेतांमध्ये राहावयास जाणाऱ्यांचे प्रमाण वाढण्यामागील हेही एक कारण होय.
शेतकऱ्यांची बिनधास्त वृत्तीही दरोडय़ांसाठी पोषक ठरत आहे. गावापासून दूर वस्तीवर राहताना सुरक्षिततेसाठी आवश्यक ते उपाय आपले आपणच करावयास पाहिजे. परंतु वस्तीवर राहणारे याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. घराचे दरवाजे, खिडक्या अतिशय तकलादू असतात. अनेकवेळा तर दरवाजे बंद न करताच शेतकऱ्यांना झोपण्याची सवय असते. वस्तीवर राहताना पहाऱ्यासाठी श्वानाची अधिक मदत होत असली तरी अलीकडे श्वान पाळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. या सर्व गोष्टी दरोडेखोरांसाठी फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळेच अगदी रात्री साडेनऊच्या सुमारासही दरोडे पडण्याचे प्रकार होत आहेत. पोलिसांनी यासंदर्भात गावागावांमध्ये वस्तींवर राहणाऱ्यांची बैठक घेऊन प्रबोधन करण्याची आणि सुरक्षिततेसाठी काय करता येण्यासारखे आहे त्याविषयी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. गावातील पोलीस पाटील यांची जबाबदारीही अशावेळी अधिक वाढते. रात्रीतून एकदा तरी वस्तीवर राहणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला दूरध्वनी करून परिस्थिती व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घेता येणे शक्य आहे.
गावातील युवकांचा समावेश असलेल्या ग्रामसुरक्षा पथकाने रात्रीतून एकेका वस्तीला भेद देण्याची ज्याप्रमाणे गरज व्यक्त करण्यात येत आहे. त्याप्रमाणे पोलिसांनीही गस्त वाढविण्याची मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.