विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना पाथर्डी फाटा परिसरात दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केली. या प्रकरणी तीन युवकांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध  इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारे पिस्तूल वा गावठी कट्टे सापडण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या मंडळींकडून बिनधास्तपणे घातक शस्त्र खरेदी केली जातात, बाळगली जातात, प्रसंगी त्यांचा घातक कामासाठी वापरही होऊ शकतो. प्रामुख्याने परराज्यात या शस्त्रांची निर्मिती होत असली तरी तो बनविणारा आणि खरेदी करणारा यामध्ये बरीच मोठी साखळी असते.
परिणामी, मुख्य सूत्रधार कधीच हाती लागत नाही, असा यंत्रणेचा अनुभव आहे. या प्रकरणातील पिस्तूल व जिवंत काडतुसे मध्य प्रदेशातून खरेदी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पाथर्डी फाटा येथील एका हॉटेलसमोर सोमवारी रात्री तीन युवक संशयास्पद अवस्थेत उभे असल्याचे गुन्हे शाखा पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने संबंधितांची चौकशी करून झडती घेतली असता प्रत्येकी ४० हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. या प्रकरणी वैभव रवींद्र विसपुते (२३, भगवती चौक, सिडको), जितेंद्र सुरेश बावीस्कर (२२, वासननगर) आणि प्रवीण भीमराव येवले (सातपूर) या युवकांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जी. डी. देवडे यांनी दिली.  पिस्तूल व जिवंत काडतुसांसमवेत संशयितांकडे दोन लाकडी कव्हरही आढळली. विनापरवाना ही पिस्तुले संशयितांनी खरेदी करून ती स्वत:च्या कब्जात ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्राथमिक तपासात संशयितांनी पिस्तुले मध्य प्रदेशातून आणल्याचे पुढे आले आहे.विधानसभानिवडणुकीची तयारी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात असे प्रकार अनेकदा उघड झाले आहेत. परराज्यात गावठी कट्टे व पिस्तुलाची निर्मिती केली जाते. ही विनापरवाना शस्त्र दलालांच्या मोठय़ा साखळीमार्फत राज्यात दाखल होतात.
साखळीतील अखेरच्या दलालामार्फत त्याला खरेदीदार शोधला जातो. अशा वेळी ज्याच्याकडे हे शस्त्र आढळते, त्याच्याविरुद्ध कारवाई होते. पण, साखळीतील अन्य घटक वा मुख्य सूत्रधार हाती लागत नाही. त्यांचा ठावठिकाणा नेहमी बदलत असतो, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मुख्य सूत्रधार नामानिराळा राहात असल्याने विनापरवाना शस्त्र विक्रीच्या अवैध व्यवसायावर नियंत्रण आणणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.