तोडफोड बोलण्याची त्यांची पद्धत कधी नकोशी वाटते. खूप बोलून गेल्यानंतर काय ते, तेच ते, असेही वाटून जाते, पण त्यांचे बोलणे हे त्यांचे अनुभवणे असते. खूप बोलून गेल्यानंतर त्यांनाही वाटते, आपण समोरच्याला खूप छळले तर नाही ना! कठोर, मृदुभाषी, अभ्यासू अशी सगळी नामविशेषणे ज्यांना लावता येतील अशा सीमा साखरेंची स्त्रीविषयक कळवळ त्यांच्या बोलण्यातून सातत्त्याने जाणवत राहते.
Change is coming, but very slow   परिस्थिती बदलत आहे, पण तो बदलण्याचा वेग अतिशय कमी आहे. अत्याचारासाठी आता मोर्चा काढण्याची गरज राहिली नाही, कारण मदतीचे हात समोर यायला आता सुरुवात झाली आहे. तरीही मदतीची ही भूमिका पूर्णपणे बदलण्यास वेळ लागेल, हे वास्तव सीमा साखरे बोलताना मांडतात. स्त्री-पुरुष समानता नव्या पिढीत आली असे जे वाटते ते खरे नाही. समानता आली हे बोलणे सोपे असले तरी सगळे वरवरचे आहे. आजही प्रेमाची परिणती लग्नात झालेली असली तरी त्यातील किती लग्न शेवटपर्यंत टिकतात, हा प्रश्नच आहे. लग्नाआधी मित्र मैत्रीण असलेली ही जोडपी लग्नानंतर ‘तू कोण, मी कोण’ अशी वागतात. अशावेळी समानता आली असे कसे म्हणता येईल? बाईला माणूस म्हणून जगताच येत नाही. जेव्हा केव्हा ती माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करते, प्रतिकार करते, आव्हानाशी लढा देण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्यावर अत्याचार केले जातात. ही भूमिका कालही होती, आजही आहे आणि कदाचित उद्याही राहील.  पुरुषी मानसिकता बदलण्यास सुरुवात झाली आहे, पण पूर्णपणे बदलण्यास बराच कालावधी जाणार आहे. जोपर्यंत स्त्री आणि पुरुष लिंगभेद बाजूला सारून खऱ्या अर्थाने मित्र होणार नाहीत, तोपर्यंत समानतेविषयी थोडी साशंकताच आहे. समाजात थोडय़ा चेतना निर्माण झाल्या आहेत आणि त्या नव्या पिढीत निर्माण होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे, हे प्रकर्षांने त्या स्वीकारतात. त्यांचा लढा हा पुरुषांविरुद्धचा आहे, असेच कित्येकदा त्यांच्याबाबत बोलले जाते. त्या पुरुषविरोधी आहे असा ठपकाही त्यांच्यावर ठेवला जातो. मात्र, हे खरे नसल्याचे त्यांच्याशी साधलेल्या संवादानंतर जाणवते. चांगल्याला चांगले म्हणताना त्यांची जीभ अडखळत नाही. एखाद्या पुरुषाने चांगले कार्य केले असेल, तर तेवढय़ाच जाहीरपणे त्या व्यक्तसुद्धा होतात. त्यांची लढाई ही पुरुषांविरुद्धची नाही तर पुरुषी अहंकाराविषयीची आहे.
राखी चव्हाण, नागपूर