पाचव्या, सहाव्या वेतन आयोगामुळे सीबीएसई, आयसीएसई, एसएससी आदी सर्वच शाळांमधील शिक्षकांचे वेतन ‘गलेलठ्ठ’ म्हणावे इतके वाढले आहे. वेतनाच्या बाबतीत शिक्षणसेवकांचा अपवाद वगळता सर्वच शिक्षक एका स्तरावर आहेत. याला आयबी किंवा केंब्रिज बोर्डाच्या शाळांचाही अपवाद नाही. पण, शाळेचा ठराविक ‘ढाचा’ (इमेज) कायम राखण्यासाठी शिक्षकांची निवड करण्यापासून त्यांच्या प्रशिक्षणापर्यंतच्या अनेक गोष्टी शाळाशाळांनुसार बदलतात. त्यामुळे शाळांच्या दर्जानुसार शिक्षकांचा ‘क्लास’ही बदलतो आहे.

उच्चभ्रू आणि गलेलठ्ठ शुल्क आकारणाऱ्या शाळांमधून नित्य नवीन उपक्रम राबविण्याला ‘पैसा’ हा मुद्दा अडचणीचा ठरत नाही. सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्डाबरोबरच अनेक राज्य शिक्षण मंडळाच्या खासगी शाळांची गणना या उच्चभ्रू शाळांमध्ये करता येईल. या उलट राज्य सरकारच्या अनुदानावर चालणाऱ्या शाळांना पैशाचे सोंग उभारणे कठीण जात असल्याने तंत्रज्ञानाचा वापर, क्षेत्रभेटी, शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आदी ‘खर्चिक’ उपक्रम राबविताना मर्यादा येतात. उच्चभ्रू शाळा (यात काही एसएससी बोर्डाच्या शाळाही आल्या) शिक्षण प्रशिक्षणाच्या बीएड, डीएड पदव्यांबरोबरच एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान असावे यासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्यांना किंवा प्रयोगशील अध्ययन तंत्रात विशेष प्रशिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य देऊन आपला ठराविक ‘ढाचा’ तयार करतात. पण विद्यार्थ्यांप्रमाणे या शाळांमधील शिक्षकांचेही ‘शिकणे’ कधी थांबत नाही. पदवी शिक्षणाच्या पुढे जाऊन नवनवीन अध्ययन तंत्रांची ओळख शिक्षकांना व्हावी, विद्यार्थ्यांशी, पालकांशी वेळोवेळी संवाद साधण्याची हातोटी त्यांच्यात यावी यासाठी प्रशिक्षणावर भर देणाऱ्या शाळा आहेत.
‘सरकारी प्रशिक्षणावर अवलंबून न राहता शाळाच आपल्या स्तरावर हे प्रशिक्षण घेऊन शिक्षकांना आपल्या ढाच्यानुसार घडवितात. इतर बोर्डाच्या शाळांमधील प्रशिक्षणाची गरज आता झिरपत झिरपत राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही येत आहे. राज्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या यशदामधील शिक्षण प्रशिक्षणाचा दर्जाही त्या दृष्टीने बदलण्यात आला आहे,’ असे शिक्षणविषयक सल्लागार संगीत गोळे सांगतात. लवकरच या बदलाची फळे राज्याच्या शाळांमधूनही पाहायला मिळतील.
तंत्रज्ञानाच्या वापर देखील शाळांना नवीन राहिलेला नाही. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमधून किंवा विप्रो वा तत्सम कंपन्यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मुलांना शिकविणे हे काही उच्चभ्रू शाळांना नवीन राहिले नाही. अध्ययनाच्या या माध्यमांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते आहे.
’ ‘ब्रॅण्ड’ महत्त्वाचा
आयबी किंवा केंब्रिज बोर्डाच्या शाळांमध्ये आपल्याकडील बीएड, डीएड पदवीला फारशी किंमत दिली जात नाही. त्याऐवजी एखाद्या विषयातील पदव्युत्तर पदवी असलेल्या शिक्षकाला प्राधान्य दिले जाते. त्यातून एखाद्याने अर्ली चाईल्डहूड डेव्हलपमेंट किंवा अध्ययन तंत्रावर आधारलेले सर्टीफिकेट किंवा पदविका अभ्यासक्रम केले असतील तर त्यांना प्राधान्य मिळते. नोकरी देताना धीरूभाई अंबानी सारख्या ‘ब्रॅण्डेड’ शाळा लेखी परीक्षा, मुलाखत, गटचर्चा अशा विविध टप्प्यांमधून शिक्षकांची निवड करतात. काही वेळा काही शाळा नेमणुकीआधी स्वत:च्या गरजेनुसार कार्यशाळा घेऊनही शिक्षकांची निवड करतात. त्यातही इंग्रजी भाषेवर सर्वाधिक भर असतो. काही आयबी शाळांमधून फेरफटका मारला तर येथील शिक्षकही एअरहोस्टेसप्रमाणे कडक आणि नीट पिनअप केलेली साडी, हलकासा मेकअप अशा कॉपरेरेट ‘लूक’मध्ये दिसतात. अर्थात शिक्षकांनी राहावे कसे, कपडे कोणते घालावे याच्या टीप्स उघडपणे दिल्या जात नसल्या तरी अप्रत्यक्षपणे सूचित केले जाते. इतके सगळे सोपस्कार करूनही वेतन फार काही ‘आऊटस्टॅण्डींग’ असते अशातला भाग नाही. पण, तरिही शिक्षकांमध्ये या शाळांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी चढाओढ असते कारण त्याचे ‘बॅण्डिंग’. अमुक-अमुक आयबी किंवा केंब्रिज बोर्डाच्या शाळेत काम केल्याचा फायदा शिक्षकांना आपल्या बायोडेटाचे वजन वाढविण्यासाठी होतो.
’ अनुभवाला महत्त्व
सीबीएसई शाळांमधील शिक्षकांचा ढाचा शाळेच्या स्वरूपाप्रमाणे बदलतो. कारण, सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळांमध्येही निरनिराळे स्तर असतात. त्यात ‘केंद्रीय मानव विकास विभागा’च्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटनच्या शाळा आणि खासगी संस्था चालकांनी चालविलेल्या शाळा अशी विभागणी करता येईल. केंद्रीय विद्यालयांमधील शिक्षकांच्या निवडीचे निकष पूर्णपणे वेगळे आहेत. त्यातही लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठीची केंद्रीय शाळा असेल तर तिथे बहुतेककरून लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नी शिक्षकांच्या किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत दिसतात. हेच चित्र हवाई दल, नौदल अधिकाऱ्यांच्या मुलांसाठीच्या शाळांमध्येही दिसते. नोकरी करायचीच ही अपरिहार्यता नसल्याने येथील शिक्षक बरेचदा आवड म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारतात. शिकविण्याच्या बाबतीत त्या अनेकदा प्रयोगशील असतात. सीबीएसई शाळांचा भर बहुतेककरून अभ्यासक्रमावर असतो. अभ्यासक्रमाचे स्वरूप विस्तृत आणि आशयगर्भ (होलिस्टीक) असल्याने नेमणुक करताना शिक्षकांच्याही अनुभवाला महत्त्व दिले जाते. इथल्या नेमणुकीसाठी बीएड, डीएडला महत्त्व असते. आता ‘शिक्षण हक्क कायद्या’नुसार केंद्रीय संघटनाच्या शाळांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते. प्राध्यापकांसाठीच्या ‘नेट’ परीक्षेच्या धर्तीवर या परीक्षेचे स्वरूप आहे. त्यामुळे, त्यात उत्तीर्ण होणे किती कठीण आहे, हे नुकतेच स्पष्ट झाले. या वर्षी या परीक्षेत देशभरातून केवळ एक टक्का शिक्षक उत्तीर्ण होऊ शकले आहेत. पाचव्या-सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे या शिक्षकांनाही वेतनश्रेणी लागू असल्याने या शिक्षकांना दहा ते ३५ हजाराच्या आसपास वेतनश्रेणी दिली जाते. या शाळांमधील कंत्राटी शिक्षकालाही १२हजाराच्या आसपास वेतन मिळते. त्यातून केंद्र सरकारचे इतर आर्थिक फायदेही या शिक्षकांना लागू असतात. पण, शिक्षणातील प्रयोगशीलतेत या शाळा कायम आघाडीवर असतात. नवीन अध्ययन तंत्रांची माहिती करून देणाऱ्या कार्यशाळा या शाळांमध्ये खूप होतात. त्यामुळे, त्याचा परिणाम शिक्षकांच्या अध्ययनावर नक्कीच होतो. दहावीला बोर्डाच्या परीक्षेचे दडपण येऊ नये म्हणून शाळा स्तरावर परीक्षा घेणे, ओपन बुक परीक्षा, ऑनलाईन परीक्षा असे अनेक बदल गेली काही वर्षे सीबीएसई शाळांमध्ये होत आहेत. त्यामुळे, येथील शिक्षकांना या बदलांशी जुळवून घेत आपल्या अध्ययन तंत्रातही बदल करावे लागत आहेत. राज्यातील शाळांमध्ये नव्याने आलेली र्सवकष मुल्यांकनाची पद्धती या शाळांमध्ये फार आधीपासून रूढ आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यातील उत्तमोत्तम गुणांना चालना देण्याचे कामही दर्जेदार सीबीएसई शाळेत चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे, एखाद्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यात शिक्षकांना प्रोत्साहीत केले जाते.
’ इंग्रजीवर प्रभुत्त्व आवश्यक
बदलांच्या बाबतीत आयसीएसई शाळा मात्र ‘स्लो अ‍ॅण्ड स्टेडी’ भूमिकेत असतात. या शाळांमध्ये बदल झटपट येत नाही. पण, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या दरवर्षी होणाऱ्या कार्यशाळांमधून परस्पर देवाणघेवाण या शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणावर होते. या शाळांमध्ये शिक्षकांचे इंग्रजीवरील प्रभुत्त्व असलेच पाहिजे. मग तो कोणत्याही माध्यमातून शिकला का असेना. शिक्षकांना विषयज्ञान चांगले असावे यासाठी बरेचदा बीएड, डीएड बरोबरच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना या शाळांमधून प्राधान्य असते. या शाळांचे व येथील शिक्षकांची वेतनश्रेणीही बऱ्यापैकी सीबीएसई शाळांच्या जवळ जाणारी असते.