बदलत्या ऋतुचक्राचा फटका स्थलांतरित पक्ष्यांनासुद्धा बसला असून, ऑक्टोबरच्या अखेरीस येणारे स्थलांतरित पक्षी तब्बल एक महिना उशिराने भारताकडे वळले आहेत. नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा या तलावांच्या आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या आवडत्या ठिकाणांवर गेल्या काही दिवसांपासून पक्ष्यांचे आगमन सुरूझाले आहे. मात्र, त्यांच्या संख्येत घट झाल्याचे पक्षीनिरीक्षकांनी सांगितले.
युरोप, रशिया, सौदी अरेबियासह आशिया खंडाच्या विविध भागात हिवाळयात प्रचंड बर्फ असल्यामुळे पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा भासतो. त्यामुळे दरवर्षी भारतासह इतर काही देशांमध्ये ठराविक कालावधीकरिता हे पक्षी स्थलांतर करतात. यावर्षी मात्र वातावरण बदलाचा चांगलाच परिणाम झाला असून, पक्ष्यांचे आगमन तब्बल एक महिना उशिरा सुरू झाले आहे. प्रामुख्याने सायबेरियातून पक्ष्यांचे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होते. नागपुरातील अंबाझरी तलाव, तसेच जवळच्याच पारडगाव आणि अमरावती जिल्ह्यातील नारायणपूर, इंदला, शेवती, तसेच गोंदिया जिल्ह्यातील सिंगारबंध, नवेगाव बांध या तलावांवरही स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नारायणपूर तलावावर ‘पाईड अ‍ॅव्होसेट’ हा यंदाचा आकर्षण आहे.
समुद्रकिनाऱ्याकडे वळणाऱ्या या पक्ष्याचे मध्यभारतात दर्शन दुर्मीळ आहे. २०१० मध्ये तो एकच दिसला होता, यावर्षी मात्र आठ दहाच्या संख्येत ते असल्याचे मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांनी सांगितले.
 बंगालच्या उपसागरातील व अरबी समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे भटकत आला असावा, असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, पेंटेड स्टार्क हे नेहमी येणारे पक्षी आहेत. बार हेडेड गीजची संख्याही ५०-६०च्या घरात असून इतर पक्षीही ३०-३५च्या घरात आहेत.
मात्र, ही संख्या वाढेल, असे वडतकर म्हणाले. गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांनीही या जिल्ह्यात सुमारे ७५ टक्के पक्ष्यांचे आगमन झाल्याचे सांगितले. संख्या कमी असली तरीही हळूहळू ती वाढेल, असे ते म्हणाले. गोंदिया जिल्ह्यातील सुमारे १०-१२ तलावांवर दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा थवा कायम हिवाळयात असतो. युरोप, मंगोलिया, सायबेरिया, मध्य आशिया, उत्तर आशिया, तिबेट परिसरातून हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. तर देशांतर्गतही पक्ष्यांचे स्थलांतर होते. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये सुमारे ४० टक्के पक्षी हे ‘वॉटरबर्ड’ या प्रकारातील आहे.
मात्र, तलावांवर होणारी अतिमासेमारी, प्लॅस्टिकचा वापर या पक्ष्यांना खाद्य आणि घरटी तयार करण्यात बाधा आणत आहेत. शिकारीचा धोकाही त्यांना आहे. त्यामुळे या स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाची गरज पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.