चतुरंग प्रतिष्ठानचे २२ वे रंगसंमेलन येत्या २९ आणि ३० डिसेंबर या दिवशी मुंबईत दादर (पश्चिम) येथील रूपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या रंगसंमेलनात साहित्य, नाटय़ आणि संगीताची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना यंदाचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात येणार आहे.
रंगसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते होणार असून रंगभूमीचे अभ्यासक-अभिनेते कमलाकर सोनटक्के हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. विजया मेहता यांचे व्यक्तिमत्व दर्शन घडविणाऱ्या ‘अभिवाचन आणि अनुभूती’ या कार्यक्रमात विक्रम गोखले, नाना पाटेकर, विनय आपटे, डॉ गिरीश ओक, तुषार दळवी, अजित भुरे, मंगला खाडिलकर, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, प्रतिमा कुलकर्णी, प्रदीप वेलणकर, स्वाती चिटणीस आदी कलाकार सहभागी होणार आहेत. विजयाबाई यांच्यावर विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, श्री. पु. भागवत, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी लिहिलेल्या लेखांचे वाचन ही मंडळी करणार आहेत. तसेच विजयाबाई यांच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफितही या वेळी दाखविण्यात येणार आहे. कलावंत आणि रसिक श्रोते यांच्यात थेट संवाद घडवून आणणारे ‘चहापान’ संमेलन ३० डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. संगीत नाटक आणि नादी यांचे अतुट समीकरण उलगडून दाखविणारा ‘नांदी दर्शन’ हा कार्यक्रम, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची दिग्दर्शक केदार शिंदे यांनी घेतलेली प्रकट मुलाखत, देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली यांची उपशास्त्रीय संगीत मैफल रंगसंमेलनात असणार आहे. ज्येष्ठ गीतकार व कवी गुलजार यांच्या हस्ते विजया मेहता यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी लिहिलेल्या सन्मानपत्राचे वाचन डॉ. वीणा देव करणार आहेत. रंगसंमेलनाच्या पूर्णोत्सव प्रवेशिका येत्या २२ डिसेंबरपासून शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी ८.३० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत मिळणार आहेत. तसेच चतुरंगच्या गिरगाव आणि डोंबिवली कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत प्रवेशिका मिळणार मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२३८९३२८२ या दूरध्वनी क्रमांकावर दुपारी २ ते ९ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन चतुरंगने केले आहे.