अपुऱ्या रक्त तपासणी यंत्रामुळे रुग्णांना खासगी प्रयोगशाळेमध्ये धाव घ्यावी लागते. तसेच उपचारातही विलंब होतो. त्यामुळे दवाखाने, प्रसतिगृहे, आरोग्य केंद्रामध्ये रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासाठी ऑटो अ‍ॅनालायझर खरेदी करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या केईएम, सायन, नायर रुग्णालयांमध्ये रक्त तपासण्याची व्यवस्था आहे. मात्र छोटे दवाखाने, प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी तेथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रक्त तपासणीसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये धाव घ्यावी लागते. खासगी प्रयोगशाळांमधील चढे दर गोरगरीब रुग्णांना परवडत नाहीत. तसेच रक्त तपासणीस विलंब झाल्यास उपचारही उशिरा सुरू होतात. त्यामुळे आता पालिकेने आपले दवाखाने, प्रसूतिगृहे आणि आरोग्य केंद्रांमध्ये ३० से.मी. ऑटो अ‍ॅनालायझर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच त्याचा प्रस्ताव स्थायी समिती पुढे सादर करण्यात येणार आहे. या ऑटो अनालायझरचा वापर रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी पालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्येही तपासणीसाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मूत्रपिंड आणि यकृताच्या विकाराने त्रस्त असलेल्या रुग्ण, रक्तातील चरबी, साखरेचे प्रमाण, काविळीची तीव्रता, यकृताची कार्यक्षमता आदी २८ प्रकारच्या चाचण्या ऑटो अ‍ॅनालायझरच्या माध्यमातून करण्यात येतील, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.