तळोजा येथील औद्योगिक वसाहतीतील मार्गावर पडलेल्या रसायनयुक्त कचऱ्यामुळे रस्त्याची घसरगुंडी झाली आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून या रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामुळे अनेक मोटारसायकलस्वार जखमी झाले आहेत. तसेच या कचऱ्याच्या दरुगधीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  आयजीपीएल कंपनी ते व्ही. व्ही. एफ कंपनीच्या मार्गावर हे टाकाऊ रसायन रस्त्याच्या मधोमध सोमवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर रसायनयुक्त कचरा पडलेला होता.
यामुळे रस्त्यावर घसरण निर्माण झाली होती. अचानक मार्गावर पडलेल्या या कचऱ्यांने वाहनचालकांना आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यास भाग पाडले. मात्र जे मोटारसायकस्वार येथून बेधडक जाण्याच्या प्रयत्नात होते त्यांना आपल्या दुचाकीसोबत कचऱ्यात लोळण्याची वेळ आली. या रसायनातून उग्र दर्प येत होता. तसेच येथून जाणाऱ्या ग्रामस्थांचे डोळेही त्यामुळे झोंबत होते. रस्त्यावर पडलेला संबंधित रासायनिक कचरा हा विघटन करणाऱ्या कंपनीच्या वाहनातून नेत असताना पडल्याची माहिती घोट ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गोंधळी यांनी दिली आहे.