सिंधू झुलेलाल वेल्फेअर सोसायटीतर्फे झुलेलाल जयंतीनिमित्त ११ एप्रिलला चेट्रीचंड महोत्सव आयोजित करण्यात आला असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मनोहर मंगलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार तलावाजवळील झुलेलाल मंदिरापासून सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक यांच्या हस्ते पूजा करण्यात आल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ होईल. बहिराणा साहाब रथाची पूजा करण्यात येईल. यावेळी महापौर अनिल सोले, उपमहापौर संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहतील.  शोभायात्रेत झुलेलाल आणि विविध पौराणिक कथांवर आधारित ६० च्यावर चित्ररथ राहणार आहेत. याशिवाय स्वामी चांदुराम सेवा मंडळ क्वोटा कॉलनी आणि खामला सिंधी पंचायतचे पारंपरिक सिंधी लोकनृत्य, आदिवासी नृत्य, सिंधी झेज, इस्कॉन हरे राम हरे कृष्ण मंडळ शोभायात्रेत सहभागी होतील. तिरुपती बालाजी दर्शन, विठ्ठल रुख्मिणी, हनुमान दर्शन, साईबाबा की ज्योत, गणेश टेकडी दर्शन, लवकुश हनुमान, कोहापूरची महालक्ष्मी आदी विविध पौराणिक विषयांवर चित्ररथ आणि कलशधारी १०८ महिला शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. शोभायात्रा सुभाष रोड, देवडिया भवन, फवारा चौक, सेवासदन, मेयो हॉस्पिटल, चंद्रलोक बिल्डींग, हंसापुरी, नालासाहब चौक, गांजाखेत, तीननल चौक, शहीद चौक, टांगा स्टँड, जागनाथ रोड, गांधी पुतळा, बडकस चौक, कोतवाली, नरसिंग टॉकीज, तिळक पुतळा मार्गे निघून मंदिरात समारोप होईल.
दरम्यान, सकाळी ५ वाजता झुलेलाल मंदिरात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता बलदेव असरानी, मधु विधानी यांच्या नेतृत्वाखाली स्कूटर मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजता महाप्रसाद व पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी महापौर अनिल सोले, उपमहापौर संदीप जाधव, खासदार विलास मुत्तेमवार, डॉ. नितीन राऊत, आमदार दीनानाथ पडोळे, स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रकाश तोतवानी उपस्थित राहणार आहेत. चेट्रीचंड उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला महंत मोहनदास ठाकूर, संतोषकुमार अडवाणी, रमेश जेसवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाहतूक व्यवस्थेत बदल
झुलेलाल जयंती कार्यक्रमामुळे ११ एप्रिलला सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आग्याराम देवी चौक ते गणेश मंदिर हा मार्ग सायकल, रिक्षासह सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. कॉटन मार्केट चौकाकडून येणारी वाहतूक आग्याराम देवी चौकातून एस.टी. स्टँड व टाटा पारसी शाळेकडे वळविण्यात येईल. टिळक पुतळाकडून येणारी वाहतूक गणेश मंदिरापासून मॉडेल मिल चौकाकडे वळविण्यात येईल. टाटा पारसी शाळेसमोरील रस्त्याने वाहने जाऊ शकतील, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.