जनतेचे प्रश्न सुटत नसल्यास आपण स्वत: मंत्रिमंडळ बैठक असो किंवा विधानसभा अधिवेशनात संघर्ष करतो. तुम्हीही जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर वेळप्रसंगी शासनाच्या विरोधातही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. प्रश्न न सुटल्यास आपणही आंदोलनात भाग घेऊ आणि जनतेला न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर प्रत्येक तालुक्यात जाऊन जनतेशी संवाद साधण्यासाठी भुजबळांनी दिंडोरी तालुक्याचा दौरा केला. तालुक्यातील लखमापूर फाटा येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे होते.
नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे स्वप्न दाखवीत जनतेला भुरळ घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने मोठय़ा अपेक्षेने भाजपला निवडून दिले. परंतु मोदी सरकारने कांदा निर्यात मूल्य वाढविले. कांदा, बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकरी व व्यापारी अशा सर्वच घटकांना त्यांनी निराश केल्याची टीका केली.
आपण जिल्ह्य़ाचा इतका विकास केला. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह विविध खात्यांसाठी भरीव तरतूद केली. तरीही असे का होते, असा प्रश्न उपस्थित करत जनता भाजपच्या भूलथापांना भुलली. परंतु जनतेला आता आपली चूक उमगल्याचे त्यांनी सांगितले. आपण मांजरपाडा प्रकल्पासह विविध वळण योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असताना विरोधक दिंडोरी, सुरगाणा भागात जनतेची दिशाभूल करत प्रकल्पाचे काम बंद पाडतात आणि येवला, मनमाड, निफाड चांदवड भागात गेले की भुजबळ कधी हे प्रकल्प पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित करतात. त्यांचा दुटप्पीपणा जनतेने ओळखण्याची गरज आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी तुमचे प्रश्न सोडविण्याची धमक असणारा आणि ते सोडविण्यासाठी सक्षम असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आगामी विधानसभेत संधी देण्याचे आवाहनही भुजबळ यांनी केले. बागायती शेतीतून जाणारे पॉवर ग्रीड मनोरा वाहिनीचे काम त्वरित थांबवण्याचे आश्वासन देत तसे न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी श्रीराम शेटे यांनी भाजपने खोटी आश्वासने देत केंद्रातील सत्ता घेतली आणि अवघ्या दीड महिन्यात जनतेला भ्रमनिराश केल्याचे नमूद केले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध झाले असून केंद्र तर गेले. किमान शेतकरी हिताचे काँग्रेस- राष्ट्रवादीचे राज्य सरकार कायम ठेवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले.
माजी आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिंडोरी वणी येथील पाणी योजना, वळण योजना, विविध बंधारे यांचे काम मार्गी लावण्याची मागणी केली. जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांचेही भाषण झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगारही उपस्थित होते.