कुठल्या तरी बुवा-बाबाच्या सांगण्यावरून रस्तेसफाई करणारे अनुयायी शेकडो मिळतील, पण मुंबईत भरलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये एक पाचवीतली चिमुकली थेट बुलढाण्याहून केवळ विज्ञानसेवेसाठी म्हणून आली होती. अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यवरांची व्याख्याने तिने ऐकली, पण याचबरोबर तिचे हात सतत या विज्ञानजत्रेत राबत होते. पाणी किंवा चहा पिऊन विद्यापीठाच्या रस्त्यांवर फेकलेले प्लॅस्टिकचे ग्लास, बाटल्या, कप, प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करून ती हे सारे कचरापेटीत टाकायची. हा परिसर स्वच्छ ठेवण्यात खारीचा वाटा या चिमुकलीचाही होता. तिच्या या ‘स्वच्छ भारत मोहिमे’मध्ये तिचे छायाचित्र छापून आणणारे कुणी नव्हते. किंवा आपण केलेला कचरा इतकी लहान मुलगी कशाला उचलतेय, याची साधी विचारपूस करणारेही कोणी नव्हते. पण, ऋतीक्षा बगडे हिच्या कामात खंड पडला नाही.
ऋतीक्षा बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिसवा गावात राहते. तिचे वडील गोपाल बगडे व्यवसायाने शेतकरी आहेत. पण, पथनाटय़ांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीचे कामही ते करीत असतात. त्यांच्या या विचारांचा परिणाम त्यांच्या मुलीवर न होईल तरच नवल.
ऋतीक्षाने अकोला आकाशवाणी केंद्रावर इंडियन सायन्स काँग्रेसविषयी ऐकले. गंमत म्हणजे तिचे गाव इतके दुर्गम भागात आहे की कधी कधी तिथे रेडिओच्या लहरीही पोहोचत नाहीत. त्याकरिता गावकऱ्यांना विशिष्ट झाडावर चढून रेडिओ ऐकावा लागतो. तिनेही अशाच रीतीने एकदा या परिषदेविषयीची माहिती ऐकली. विज्ञानाची परिषद तब्बल ५० वर्षांनी मुंबईत भरते आहे, म्हटल्यावर तिने आणि तिच्या वडिलांनी थेट मुंबई गाठायचे ठरविले. पदरचे पैसे मोजून हे दोघे बुलढाण्याहून डोंबिवलीतील आपल्या नातेवाईकाकडे येऊन पाहोचले. दररोज डोंबिवली ते विद्यापीठाचे कलिना संकुल असा प्रवास करून हे बापलेक येथे यायचे. पहिल्याच दिवशी तिने पाहिले की, परिषदेत आलेले पाहुणे चहा, पाणी पिऊन कचरा रस्त्यावरच फेकत आहेत आणि येथील परिसर घाण करीत आहेत. तो कचरा पाहून तिला राहवले नाही. तेव्हापासून दिसेल तो कचरा उचलून ती कचरापेटीत टाकू लागली. स्वयंस्फूर्तीने कचरा उचलण्याबरोबरच ऋतीक्षाने परिषदेत सहभागी झालेल्या मान्यवरांची भाषणेही ऐकली. ‘प्राईड ऑफ इंडिया’ या प्रदर्शनाचाही आनंद घेतला. बुद्धीला खाद्य पुरविणारे खेळही ती खेळली. त्यासाठी तिला छोटी-मोठी बक्षिसेही मिळाली. पण, सायन्स काँग्रेसमध्ये कचरा उचलून तिने केलेल्या अनोख्या विज्ञानसेवेला तोड नाही.

या मोठय़ा कार्यक्रमात अनेक परदेशी पाहुणेही आले आहेत. कचरा साचून राहून हा परिसर गलिच्छ दिसू नये म्हणून मी स्वत:च कचरा उचलत राहिले. जिथे कुठे मला असा कचरा दिसे तो मी जमा करून कचराकुंडीत टाकत असे. या सगळ्यात मला विज्ञानावरचे प्रदर्शन फार आवडले. विज्ञान खेळांची मजा लुटली. मोठे होऊन मलाही असे काही तरी करायला आवडेल.
ऋतीक्षा बगडे.