उरणमार्गे मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या चिरनेर दिघाटी खिंडीतून जड कंटेनर वाहतुकीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे या खिंडीतील अपघाताचेही प्रमाण वाढू लागले आहे. या परिसरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना न केल्यास खिंडीत मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक विभागाने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

सोमवारी चिरनेरवरून खिंडीतून जाणाऱ्या एका जड वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने खिंडीच्या वळणावर चाळीस फुटी कंटेनर कलंडला. या अपघातात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नवी मुंबईच्या हेटवणे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे शेतीत पाणी शिरून शेतकऱ्यांच्या भाज्यांचे नुकसान झाले आहे. तर याच खिंडीत आणखी एका कंटनेरचा अपघात झाला आहे. याच वळणावर एका पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनालाही अपघात झाल्याची घटना ताजी आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील गव्हाण फाटामार्गे चिरनेर खिंड ते महामार्ग असा प्रवास करणाऱ्या हलक्या प्रवासी वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करण्यासाठी जड वाहने या मार्गाचा वापर करू लागली आहेत. या रस्त्यातील वाढत्या वाहनांमुळे अपघात घडू लागल्याची माहिती येथील रहिवासी संतोष म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच वाहनांच्या वेगामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांनाही धोका निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.