वर्ष – रुग्ण मृत्यू

२०१० -११ १,२६, ३३१ ५९७
२०११-१२ ९९, ८३९ ३०६
२०१२-१३ ९९, ८२७ २५०
२०१३-१४ १,१८, १८० २६०
२०१४-१५ १,१६, ७५७ २६०
गेली काही वर्षे दहशत पसरवलेल्या डेंग्यू, मलेरियापेक्षाही अतिसार हा सायलंट किलर ठरला आहे. या आजारामुळे डेंग्यू, मलेरियाच्या एकत्रित मृत्यूपेक्षाही जास्त मृत्यू होत असून यावर्षी डेंग्यू, मलेरियाचा प्रभाव कमी झालेला असताना अतिसाराची साथ मात्र कायम आहे. दूषित पाण्यामुळे होत असलेल्या या आजाराचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो. अतिसाराच्या मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू ० ते ४ वयोगटातील आहेत, तर पाच वर्षांखालील ११ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या सर्व पाश्र्वभूमीवर पालिकेला जाग आली असून ८ ऑगस्टपर्यंत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य मोहीम राबवण्यात येत आहे.
दूषित पाणी व रस्त्यावरचे उघडे, बुरशी लागलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटदुखीचे आजार होतात. दरवर्षी अतिसारामुळे लाखभर लोक आजारी पडतात. एवढेच नव्हे तर अतिसारामुळे मृत्यूंचीही संख्या अधिक आहे. २०१४-१५ या वर्षांत मलेरियामुळे १०३ मृत्यू झाले, तर डेंग्यूमुळे १०१ मृत्युमुखी पडले. याच काळात अतिसारामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या २६० आहे. मात्र मलेरिया- डेंग्यूप्रमाणे या आजाराचे प्रमाण उच्चभ्रू वस्त्यांमध्ये नसल्याने या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र सांडपाण्याच्या वाहिनीजवळून जाणारी जलवाहिनी, गळतीमुळे दूषित होणारे पाणी, उघडय़ावरचे, शिळे अन्नपदार्थ यामुळे वर्षभरात शंभरापैकी एकाला तरी पोटदुखीने कळवळायला होते.
प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, सांताक्रूझ, ग्रॅण्ट रोड आदी भागांत सर्वात जास्त अतिसाराचे रुग्ण आढळतात. त्यातही लोकसंख्येच्या तुलनेत विचार केला तर गिरगाव, ग्रॅण्ट रोड आणि डोंगरी, जे जे रुग्णालय परिसर या भागात अतिसाराचे प्रमाण जास्त आहे. सी विभागात ५४ व्यक्तींमधील एकाला, डी वॉर्डमध्ये ६५ पैकी एका व्यक्तीला, तर बी विभागात ७१ व्यक्तींपैकी एकाला वर्षभरात अतिसार झाला. शहरात सरासरी १०७ व्यक्तींमागे एकाला अतिसार झाला.
स्वच्छ पाणी व सुरक्षित अन्न हा अतिसारावरील हमखास उपाय असला तरी गरीब वस्त्यांमध्ये या दोन्ही मूलभूत गोष्टींचा पुरवठा करणे पालिका व राज्य सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे आता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून २७ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा पाळण्यात येत आहे. त्यातही १ ऑगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण केले जाणार असून, त्यानंतर शिशुपोषण व स्तनपानावर लक्ष केंद्रित केले जाईल. यादरम्यान ओ.आर.एस., झिंक गोळ्यांचे मोफत वाटप, जलसंजीवनी बनविण्याची प्रात्यक्षिके, स्तनपान व शिशुपोषणाबाबतचे समुपदेशन केले जाईल. अतिसार झालेल्या बालकांना ओ.आर.एस. व िझक गोळ्यांमुळे जुलाबाची संख्या कमी होण्यास व न्युमोनियापासून संरक्षण होण्यास मदत होते. जस्ताचा पुरवठा झाल्यामुळे भूक व वजन वाढते.

२०१४-१५ मधील अतिसाराचे सर्वाधिक रुग्ण
कुर्ला – १०,१४३
घाटकोपर – ८,१४०
अंधेरी पूर्व – १०,४२८
एच पूर्व – ६,८८४
ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल- ५३०२
अतिसार का होतो- दूषित पाणी, उघडय़ावरचे, शिळे, बुरशी लागलेले अन्नपदार्थ
लक्षणे – पोटदुखी, जुलाब, उलटय़ा, शरीरातील पाणी कमी झाल्याने कमालीचा थकवा.
उपाय – भरपूर पाणी, जलसंजीवनी, फळांचे रस, आराम.