रोज कॉलेज, ऑफिसला जायला तयार होताना किंवा कोणत्याही पार्टीला जाण्यापूर्वी आपल्या मेकअप-कीटमधील एका गोष्टीकडे तरुणी कधीच दुर्लक्ष करत नाहीत, ती म्हणजे ‘नेल-पॉलिश’. रोज आपल्या कपडय़ांना मिळतीजुळती असणारी नेल-पॉलिश लावण्यापासून ते अगदी नेल-आर्टवर हजारो रुपये खर्च करण्यापर्यंत हे वेड जाऊ शकते. सहसा आपल्याकडे नेल-पॉलिश लावताना कपडय़ांच्या रंगाचाच विचार केला जातो. पण आता हाही ट्रेण्ड बदलत असून चक्क शूजच्या सोलच्या रंगाशी जुळणारी नेल पॉलिश बाजारात आली आहे! ‘क्रिस्टिअन लुबिटन’ या फ्रेंच फुटवेअर ब्रॅण्डने त्यांचे नवीन नेल-पॉलिश कलेक्शन बाजारात आणले असून, या कलेक्शनची विशेष बाब आहे त्यांची ‘रोश लुबिटन’ नावाची लाल रंगाची नेल-पॉलिश. ही नेल-पॉलिश या कलेक्शनमधील सर्वात महाग शेड आहे. कारण ही शेड त्यांच्या ‘आयकॉनिक’ ‘लाल सोल’शी मिळतीजुळती आहे. ‘क्रिस्टिअन लुबिटन’ हा ब्रॅण्ड त्यांच्या उच्चप्रतीच्या शूजनिर्मितीसाठी ओळखला जातो. हॉलिवूडच्या कित्येक तारका रेड काप्रेटवर या ब्रॅण्डचे शूज मिरवताना दिसतात. विशेष म्हणजे, या ब्रॅण्डअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या ‘हिल्स’च्या मागच्या बाजूच्या ‘सोल’ एका विशिष्ट शेडच्या लाल रंगाचा असतो. हा लाल रंगच या ब्रॅण्डची खरी ओळख आहे. त्यामुळे ब्रॅण्डला आपल्या या खास ‘लाल शेड’वर गर्व आहे. म्हणूनच त्यांनी या शेडशी मिळतेजुळते नेल-पॉलिश बाजारात आणले आहे. आताच्या घडीला हे जगातील सर्वात महागडे नेल-पॉलिश असून त्यांची किंमत ५० डॉलर आहे. या नेल-पॉलिशचा फक्त रंगच शूजशी मिळता जुळता नाही आहे, तर त्याच्या बाटलीचा आकार आठ इंच लांब टाचांसारखा आहे. त्यामुळे ज्या तरुणींना या ब्रॅण्डचे शूज घेणे परवडणार नसेल त्यांच्यासाठी हे नेल-पॉलिश नक्कीच दिलासा देणारे असेल. त्यामुळे आता तुमच्या आजूबाजूला कोणी आपल्या हिल्सच्या सोलला मॅच करणारे नेल-पॉलिश लावले तर आश्चर्य मानून घेऊ नका. कारण लवकरच, हा ट्रेंड बाजारात येऊ शकतो.

क्रिस्टिअन लुबिटन या ब्रॅण्डच्या शूजच्या लाल रंगाचा जन्मच मुळी नेल-पॉलिशच्या शेडमधून झाला होता. त्यामुळे आता नेल-पॉलिशकडून काही वर्षांपूर्वी घेतलेला तिचा रंग परत करण्याची वेळ आली आहे.
क्रिस्टिअन लुबिटन, ब्रॅण्डचे सर्वेसर्वा