नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ खासगी लोकसहभागातून बनविला जाणार असला तरी सिडको या वर्षी या प्रकल्पावर ५६५ कोटी ५६ लाख रुपये खर्च करणार असून शहरात चक्क पर्यटन वाढावे यासाठी तीन कोटी रुपये खर्च करणार आहे. नेरुळ-उरण रेल्वेसाठी सिडकोने मध्य रेल्वेला एक हजार ७३८ कोटी दहा लाख रुपये देण्याचे कबूल केले असून त्यातील १०० कोटी रुपये या वर्षी दिले जाणार आहे. सिडकोच्या तिजोरीत या वर्षी भूखंड, घरविक्रीतून तसेच सेवा कर आणि अतिरिक्त भाडेपट्टा शुल्कापोटी चार हजार २११ कोटी रुपये येण्याची अपेक्षा आहे. त्याबदल्यात खर्च जास्त असून १४० कोटी पाच लाख सिडकोला अधिक लागणार आहेत.

सिडकोच्या वार्षिक अर्थसंकल्पात या बाबी स्पष्ट करण्यात आल्या असून सिडकोने नुकताच आपल्या अर्थसंकल्पावर संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करून घेतले आहे. राज्यात अनेक पालिका, नगरपालिका आणि सरकारचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केले जातात मात्र सिडकोची स्थापना कंपनी कायद्यानुसार झाल्याने सिडको मार्चनंतर आपला वार्षिक ताळेबंद सादर करीत असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक मंदीच्या या काळात सिडकोने भूखंडविक्रीतून एक हजार ८६६ कोटी ४३ लाख रुपये येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक भूखंडविक्री, तसेच वाशी येथील प्र्दशन केंद्राचे भाडे अशा सर्व पणन व्यवस्थापनातून सिडकोला दोन हजार ९३३ कोटी ८२ लाख रुपये येतील अशी आशा आहे. याशिवाय खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल या भागातील सेवा कर, अतिरिक्त भाडेशुल्क, थकबाकी असे मिळून २०१५-२०१६ या वर्षी सिडकोला चार हजार २११ कोटीच्या कमाईची खात्री आहे. या बदल्यात सिडकोसमोर खर्च देखील त्याच किंबुहना त्यापेक्षा जास्त वाढून ठेवण्यात आला आहे.
सिडकोचा या प्रकल्पात जमिनीच्या बदल्यात २६ टक्के हिस्सा कायम राहणार आहे. सिडकोच्या सध्या सुरू असलेल्या कामांवर ९३७ कोटी सहा लाख रुपये खर्च होणार असून ३६० कोटी ३० लाख रुपये खर्चाची नवीन स्थापत्य कामे हाती घेतली जाणार आहेत. खारघर, पनवेल,कामोठे भागातील सौंदर्यीकरणावर सिडको १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च करणार आहे. सिडको क्षेत्रात भविष्यात होणारी वाहतूककोंडी याचा विचार आजपासून करण्यात आला असून यावर २१७ कोटी ८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
रायगड परिसरात विमानतळ, दिल्ली कॉरिडोअर, वडाळा न्हावाशेवा सी लिंक, मेट्रो असे बडे प्रकल्प येत असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. सिडकोने यापूर्वी घेतलेल्या कर्जावर ३८ कोटी ८१ लाख रुपये परतावा व व्याज दिला जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी ४४ कोटी ४६ लाख रुपये आणि साडेबारा टक्के योजनेतील भूखंडावरील पायाभूत सुविधांवर १८१ कोटी १८ लाख रुपये खर्च करण्याची तयारी सिडकोने केली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या देखरेखीखाली हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून त्यात प्रकल्पग्रस्तांच्या सर्वागिण विकासासाठी भर देण्यात आला आहे. जमेपेक्षा खर्च जास्त होणार असल्याने सिडकोला १४० कोटी पाच लाख रुपये वर्षांअखेर जास्त लागणार आहेत.
विमानतळाच्या कामासाठी ग्लोबल निविदा
सिडकोचे सध्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रकल्प नवी मुंबईत सुरू आहेत. त्यातील पनवेल येथील विमानतळ हा सिडकोचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यावर या वर्षी ५६५ कोटी ५६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. विमानतळासाठी लागणारे सपाटीकरण, टेकडय़ांची उंची कमी करणे, भराव यासाठी यापूर्वीच शेकडो कोटी खर्च केले गेले असून या वर्षी या कामाची ग्लोबल निविदा काढली जाणार आहे. तिचा मसुदा तयार करण्याचे काम सध्या सुरू असून विमानतळ प्रकल्पग्रस्त, त्यांच्या सुविधा यांच्यावर सिडको ही रक्कम खर्च करणार आहे. हा विमानतळ खासगी, लोकसहभागातून उभा केला जाणार आहे. त्याचा खर्च पंधरा हजार कोटी पर्यंत रुपये गृहीत धरण्यात आला आहे पण हा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. ज्या कंत्राटदाराला हे काम मिळणार आहे. तो वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या जीवावर हा प्रकल्प उभारणार आहे. त्याबदल्यात या कंत्राटदाराला या विमानतळाचे परिचलन दिले जाणार आहे.
वर्षांला दहा घरे बांधणार
सिडकोकडे सध्या विक्रीसाठी जमीन कमी शिल्लक राहिली आहे पण कळंबोली परिसरात व्हिडीओकॉनला सरकारने एलईडी प्रकल्पासाठी दिलेली जमीन परत मिळविण्यात सिडकोला यश आल्याने सिडको ही जमीन येत्या काही काळात विकू शकणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी गृहप्रकल्पही सुरू केले जाणार आहेत. ही जमीन ३०० एकरच्या घरात आहे. तळोजा येथे लवकरच नवीन गृहप्रकल्पाची सुरुवात केली जाणार असून सिडकोने वर्षांला दहा हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे या घरविक्रीतून सिडकोला ४२४ कोटी ४९ लाख रुपये मिळतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.