वाशी येथे सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या शासकीय प्रदर्शन केंद्राच्या उदघाटनाला अखेर मूर्हत लाभला असून मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत हे अद्यावत आणि अधुनिक प्रदर्शन केंद्र लोकांसाठी खुले होणार आहे. पर्यावरणदृष्टय़ा ग्रीन इमारत असलेल्या या केंद्रावर सिडकोने २४८ कोटी रुपये खर्च केले असून नवी मुंबईतील हॉटेल्स व्यवसायाला हे केंद्र चालना देणारे ठरणार आहे. हे केंद्र भाडेपटय़ावर घेण्यास मात्र अद्याप पात्र ठेकेदार न आल्याने ती निविदा पुन्हा काढली जाणार आहे.
गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, अर्बन हाट, ग्रामविकास भवन यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पानंतर सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील साडेसात हेक्टर जागेवर हे भव्य असे प्रदर्शन केंद्र (एक्झिबिशन सेंटर) उभारले आहे. देशातील बडय़ा उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाचे प्रदर्शन मांडता यावे यासाठी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या पाश्र्वभूमीवर हे कायम स्वरुपी प्रदर्शन केंद्र बांधण्यात आले असून त्या ठिकाणी सुमारे २१ हजार चौरस मीटरचे वातानुकुलीत असे भव्य सभागृह उभारण्यात आले आहे. या ठिकाणी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपली अनेक वाहने प्रदर्शनासाठी एकाच वेळी ठेऊ शकणार आहेत. याच इमारतीत दोन भागात विभागलेले उद्योग केंद्र (बिझनेस सेंटर) देखील असून त्याचे क्षेत्रफळ साडेसात हजार चौरस मीटर आहे. उद्योजकांसाठी ७५० आसन क्षमता असलेले सभागृह, बैठक व्यवस्था, वाचनालय, फूड कोर्ट यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या वेशीवर आणि पुणे नाशिक पासून दोन तासाच्या अंतरावरील या केंद्रामु़ळे नवी मुंबईच्या नावलौकिकात आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. प्रदर्शनात येणारे उद्योजक व इतर सहकाऱ्यांच्या राहण्यासाठी लागणारे हॉटेल्समुळे येथील हॉटेल्स उद्योगाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
 या सेंटरच्या वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी भाडेपटय़ाकरीता सिडकोने नुकतीच एक निविदा काढली होती. पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या कामासाठी एकच निविदा आल्याने सिडकोने पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रावर झालेला खर्च वसुल करण्यासाठी सिडकोने ही शक्कल लढवली आहे.
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लवकरच लागणार असल्याने भाडेपटय़ाने देणाऱ्या या निविदेचा सोक्षमोक्ष लागण्याची वाट न पाहता सिडकोने उदघाटनाचा बार उडवण्याचे ठरविले असून अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय गुरु उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे.