म्हाडाने मीरा रोड येथे नागरिकांना साडेदहा लाखात घर दिल्याची घटना ताजी असताना खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येत असलेली सिडकोची तीन हजार २९२ घरे महागच असल्याचे स्पष्ट होत आहेत. या घरांची अर्ज विक्री २२ जुलैपासून होणार असून चटई क्षेत्रावर आकारण्यात आलेला दर हा खासगी बिल्डरांच्या घराएवढाच असल्याची बाब सिडकोच्या अर्थ विभागाने स्पष्ट केली आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकांसाठी बांधण्यात येणाऱ्या २८० चौरस फूट घरासाठी ५६३६ रुपये तर अल्प उत्पन्न गटासाठी हा दर सात हजार ३८ रुपये इतका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खारघरमधील व्हॅलीशिल्प या आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात अधिक दर ठेवणाऱ्या सिडकोने आपला हट्ट कायम ठेवला आहे. सिडकोला जमिनीपोटी एक रुपयादेखील खर्च करावा लागत नाही हे इथे नमूद करण्यासारखे आहे.
सिडकोने वर्षभरात सहा हजार घरे बांधण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी घणसोली, तळोजा, खारघर, येथील जमिनींची निवड करण्यात आली आहे. यातील सुमारे साडेचार हजार घरे खारघर सेक्टर ३६ येथे बांधण्यात येत आहेत. पुण्यातील बी. जी. शिर्के कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
व्हॅलीशिल्पजवळच उभारण्यात येणाऱ्या तीन हजार २९२ घरांच्या संकुलातील घरेदेखील महाग असल्याचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले. खासगी बिल्डर जमीन विकत घेण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत असल्याने तो त्या जमिनीचा भाव गृहीत धरून त्यावर बांधकाम खर्च लावून दर आकारत असल्याचे दिसून येते. सिडकोने नवी मुंबईत प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडीमोल दामाने (एकरी तीन हजार रुपये) घेतलेल्या आहेत. त्या जमिनीवर गृहसंकुल उभारताना सिडकोचा अर्थ नियोजन विभाग जमिनाचा विद्यमान बाजारभाव गृहीत धरून घरांच्या किमती लावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ नागरिकासांठी बांधण्यात येणाऱ्या ७०४ घरांना पाच हजार ६३६ रुपये दर आकारलेला आहे. हा दर चटई बांधकामावर आहे, एवढाच यातील फरक आहे. दुसऱ्या प्रकारातील घरांना सात हजार ३८ रुपये दर आकारण्यात आला आहे. हा दर आजूबाजूला बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या दराएवढाच आहे. उलट त्यांची घरे विकली जात नसल्याने एखादा रोकड रक्कम देणार असल्यास ते दर कमी करण्यास मागे पुढे पाहत नाही. सिडकोत ही तरतूद असण्याचा प्रश्न येत नाही. म्हाडात १४ वर्षांपूर्वी घर आरक्षित करणाऱ्या नागरिकांना केवळ आठ लाख रुपये जास्त आकारून मीरा रोड येथे मंगळवारी २७२ घरे देण्यात आली. मुंबईच्या कुशीत असणाऱ्या या घरांची किंमत सिडकोच्या घरांपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. त्यात स्टील, बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यास घरांच्या किमती वाढवाव्या लागतील, असे हिंदुराव यांनी स्पष्ट केले आहे. विमानतळामुळे तुमच्या घरांच्या किमती गगनाला भिडणार असल्याचे सांगण्यास हिंदुराव विसरले नाहीत. विमानतळ येणार येणार म्हणून या भागातील जमिनींच्या आणि घरांच्या किमती अगोदरच खासगी बिल्डरांनी वाढवलेल्या आहेत, पण विमानतळ अद्याप हवेतच घिरटय़ा मारत असल्याचे चित्र आहे.