पोलिसांच्या हद्दीचा वाद आणि सरकारी खात्यांतील विभागाचा वाद यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरण. तालुक्यातील बारा हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या करंजा परिसरातील सात पाडय़ांना पाणीपुरवठय़ाच्या अनेक योजना राबवूनही मागील अनेक वर्षांपासून नळाद्वारे पंधरा दिवसांतून एकदाच पाणी येत असल्याने सिडकोकडे ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर यांपैकी काही पाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
उरण तालुक्यातील रानसई तसेच लघूपाटबंधारे विभागाच्या पुनाडे धरणामुळे तालुक्यातील बहुतांशी गावांना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी रानसई धरणाच्या पाण्याची पातळी घटली आहे. पुनाडे धरणाला गळती लागल्याने पाणीपुरवठय़ात अडचणी निर्माण होत आहेत. एक ते दीड लाख लिटर पाणीपुरवठा होणाऱ्या करंजा परिसरातील पाणीटंचाई मात्र मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. यासाठी अनेक योजना राबवून कोटय़वधी रुपयांचा खर्चही करण्यात आला आहे. मात्र तो वाया गेल्याने पंधरा दिवसांतून येणारे पाणी साठवून ठेवून ते वापरावे लागत असल्याने येथील नागरिकांना दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
या संदर्भात पंचायत समितीचे अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता उरण तालुका २००८ पासून टँकरमुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे पाणीटचाईमुळे तालुक्यात टँकर सुरू असताना उरण पंचायत समितीच्या लेखी तालुका टँकरमुक्तच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडकोच्या हेटवणे योजनेकडे लक्षकरंजा परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्याची योजना आखलेली आहे. मात्र या योजनते अनेक अडथळे असल्याने ही योजना केव्हा पूर्ण होणार याकडे करंजा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उरण तालुका टँकरमुक्त करण्यासाठी दोन्ही विभागांनी तोडगा काढण्याची मागणी करंजा परिसरातील जनतेकडून केली जात आहे.