स्थानिक कलावंतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कौशल्य असून त्यांना गरज आहे योग्य मार्गदर्शनाची. सिनेसृष्टीत विविध संधी आहेत. त्या नाशिककर कलावंतांना खुल्या करून देण्यासाठी रविवारी नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच नाशिकच्या सर्व कलावंतांना घेत मराठी चित्रपट सुरू करणार असल्याची घोषणा भारतीय सिनेयुग प्रॉडक्शन अॅण्ड अॅॅकॅडमीचे संचालक विवेक देवडीकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी अॅकॅडमीचे साहाय्यक संचालक अनिल शिंपी उपस्थित होते. आपणास सुरुवातीपासून सिनेसृष्टीचे जबरदस्त आकर्षण राहिल्याचे देवडीकर यांनी सांगितले. मात्र उदरनिर्वाहासाठी एसबीआयमध्ये नोकरी केली. २२ वर्षांच्या सेवेत ही सृष्टी नेहमीच खुणावत राहिली. या क्षेत्रात काही काम करण्याचा विचार जेव्हा केला त्या वेळी मुंबई, पुणे याशिवाय कुठेच संधी नाही, असे अनेकांकडून सांगण्यात आले. मुंबई-पुण्याच्या वाऱ्या पाहता हे सर्व कितपत झेपेल याविषयी साशंकता निर्माण झाली. अॅकेडमीच्या सहकार्याने कळवण येथे १५ दिवसांची सिनेसृष्टीवर मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. त्यात ३० कलावंतांनी सहभाग नोंदविला. त्यातील आठ कलाकारांना सोबत घेऊन एक टेलीफिल्म तयार केली. ती सध्या यू टय़ूबवर सर्वाना पाहता येईल. दरम्यान, नाशिकमध्ये सिनेसंस्कृती रुजावी, त्या दृष्टीने पोषक वातावरण तयार झाले आहे. स्थानिक कलाकार मुंबई-पुण्याच्या वाऱ्या करण्यात दंग आहेत. काही पहिल्याच पायरीवर अडखळले. अशा सर्व कलावंताना योग्य दिशा मिळावी आणि सिनेसृष्टीत नाशिकचे नाव ठळकपणे अधोरेखित व्हावे या दृष्टीने अॅकेडमीने कार्यक्रमाची आखणी केल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय सिनेयुग प्रॉडक्शन अॅण्ड अॅकॅडमीच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘सिने जगतातील करिअर’ या विषयावर नि:शुल्क कार्यशाळा होईल. त्यात चित्रपट मालिकांमध्ये करिअरच्या विविध संधी, अभिनय, कॅमेरा, लेखन, दिग्दर्शन, वेशभूषा यासह अन्य उपलब्ध पर्याय, काय करावे, कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत बाबाजी फेम ज्येष्ठ कलाकार उदय टिकेकर, आदिती सारंगधर यांच्यासह नाना खेडेकर, संजय लोखंडे आदी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या निवडक कलावंत, शहरातील काही कलाकार यांच्यासोबत तंत्रज्ञासह कलावंत असे संपूर्ण नाशिककर कलावंत असलेला एक मराठी चित्रपट सुरू करण्याचा मानस देवडीकर यांनी व्यक्त केला. जूनमध्ये या कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी ऑफिस क्र. २, दुसरा मजला, लक्ष्मी विरल हाइट्स, अशोका मार्ग, अशोका ऑफिससमोर, नाशिक किंवा ७७१९०२९३३० या क्रमांकावर संपर्क साधावा.