मुंडले एज्युकेशनल ट्रस्टद्वारा संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टसच्या प्रदर्शन मालिकेतील शिल्पकलेच्या कलाविष्काराचे प्रदर्शन लक्ष्मीनगरातील सिस्फाच्या छोटय़ा गॅलरीत सुरू झाले आहे. सिस्फाच्या विविध कला विभागाच्या प्रमुखांच्या कला प्रदर्शनचा हा तिसरा टप्पा आहे. याआधी सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्न्ो यांचे ‘ब्लॅक होल’ हे चित्र प्रदर्शन रसिकांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर ग्राफिक विभागाचे प्रमुख अक्षय तिजारे यांच्या ग्राफिक कलेलासुद्धा रसिकांनी दाद दिली.
या प्रदर्शन मालिकेतील तिसरा टप्पा हा सिस्फाच्या शिल्पकला विभागाचे प्रमुख प्रा. रवीप्रकाश सिंग आणि त्यांची विद्यार्थिनी हिमांशु खोब्रागडे या गुरुशिष्यांच्या शिल्पकलेचा आहे. ‘क्ले, इसेन्स अँड वुई’ या शीर्षकाखाली असलेल्या एकूण ३० कलाकृती या प्रदर्शनात असून, माती, टेराकोटा, प्लास्टर, फायबर, धातू आणि मिश्र माध्यमातील या विविध कलाकृती प्रदर्शनाच्या आकर्षण आहेत. गुरुशिष्य परंपरेचा पुन्हा एकदा अवलंब करून या शिल्प प्रदर्शनाची आखणी करण्यात आली आहे. बनारस येथील रविप्रकाश सिंग हे या शिल्पकलेचे विभाग प्रमुख असून, सिस्फा येथून शिल्पकलेत बीएफए झालेली व बनारसला एमएफए आणि एचआरड ची शिल्पकलेची शिष्यवृत्ती मिळवलेली हिमांशु खोरगडे या गुरुशिष्यांचे हे शिल्प प्रदर्शन आहे. गुरू आणि शिल्प यांच्या नात्यातील एका आगळयावेगळया आशयाचे हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी मेजवानी ठरणार आहे. अतिशय संवेदनशील विषयाची हाताळणी आणि माध्यमांची ठेवण हे या शिल्प प्रदर्शनाचे वैशिष्टय़ आहे. रोजच्या कुटुंबातील घटक असलेली मांजर, उंदीर, पक्षी वगैरेच्या घटकांनी या संवेदनशील कलाकृती नटल्या आहेत.
या प्रदर्शनाचे उद्घाटन रोटेरिशन आणि सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉज्ीचे उपप्राचार्य राजेंद्र गोवर्धन यांनी केले. सिस्फा हे शिल्पकलेत उच्च पदवी देणारे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव कलामहाविद्यालय आहे आणि नागपूरकर म्हणून त्याचा अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. चंद्रकांत चन्न्ो यांनी प्रदर्शनाची भूमिका समजावून सांगितली. शिल्प माध्यमांची संवेदनशिलता आपल्या अभिव्यक्तीचे साधन म्हणून प्रभावीपणे वापरणारे हे कलाकार असून त्यांनी प्रभावीरित्या घटकांची मांडणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. रसिकांसाठी हे प्रदर्शन १६एप्रिलपर्यंत रोज सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरू राहणार आहे.