महापालिकेच्या मंडयांमधील साफसफाई नेमकी कोणी करायची असा प्रश्न सध्या निर्माण झाला असून घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि बाजार विभागातील अधिकारी एकमेकाकडे बोट दाखवून मंडईतील व्यापारी आणि नागरिकांची टोलवाटोलवी करीत आहेत. मात्र मंडई परिसर आणि आसपासच्या नागरिकांना दरुगधीचा सामना करावा लागत आहे. परिणामी आसपासच्या परिसरात आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. डेंग्युच्या साथीचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रॅन्टरोडमधील लोकमान्य टिळक मंडईच्या आसपास राहणारे रहिवाशी सध्या याचा प्रत्यय घेत आहेत.
ग्रॅन्ट रोडमधील लोकमान्य टिळक मंडईमध्ये मासळी आणि मांस खरेदीसाठी थेट गिरगाव आणि मुंबई सेंट्रलमधील रहिवाशी येतात. ही मंडई चकाचक करण्यासाठी मोकळ्या जागेत काही वर्षांपूर्वी लाद्या बसविण्यात आल्या आणि बाजार विभागाची एक छोटी चौकीही बांधण्यात आली. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अल्पावधीतच डुगडुगू लागलेल्या लाद्यांखाली पाणी साठून डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होऊ लागली. लाद्या बसविल्यानंतर कंत्राटदाराने बांधकाम साहित्य आणि डेब्रिज मंडईच्या कचराकुंडीजवळच फेकून दिले. कापलेल्या कोंबडय़ांचे टाकाऊ अवयव आणि पिसांसाठी छोटय़ा कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. परंतु बुधवार, शुक्रवार आणि रविवारी या कचराकुंडय़ा कचऱ्याने ओसंडून वाहात असतात. कोंबडय़ांच्या रक्ताचा सडा पडलेला असतो. अनेक वेळा शेजारीच पडलेल्या डेब्रिजवर हा कचरा सांडतो. मंडईची संरक्षक भिंत घुशींनी पोखरल्याने पावसाच्या पाण्याबरोबर हा किडेयुक्त कचरा शेजारच्या इमारतीमध्ये जातो. परिणामी आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो.
हा कचरा तात्काळ उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी तक्रार या भागातील रहिवाशी वारंवार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौकीतील अधिकारी विजयालक्ष्मी कदम यांच्याकडे करीत आहेत. परंतु हे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नसून ते बाजार विभागाचे असल्याचे सांगून त्या रहिवाशांची बोळवण करीत आहेत. तर बाजार विभागाचे अधिकारीही कानावर हात ठेऊन हे काम घनकचरा व्यवस्थापन विभागाचे असल्याचे तुणतुणे वाजवत आहेत. हा कचरा उचलण्यासाठी लोढा फाऊंडेशनला आपण विनंती करीत आहोत, असेही कदम यांनी रहिवाशांना सांगत आहेत. मात्र लोढा फाऊंडेशनचे कर्मचारी एक दिवस आले आणि त्यांनी कचरा गोणीत भरला आणि त्या तेथेच टाकून निघून गेले. आता या दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत हा परिसर अस्वच्छतेचे आगार बनू लागला आहे.
हा कचरा उपसण्यासाठी मशीनची आवश्यकता आहे. मात्र मध्येच उभारलेल्या बाजार विभागाच्या कार्यालयामुळे मशीन कचऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आता हे कार्यालय तोडून अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सर्व सोपस्कार पूर्ण करून कचरा उचलण्यासाठी किमान सहा महिन्यांचा अवधी लागेल, असे बाजार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बाजार विभागातर्फे एक आठवडय़ापूर्वी या मंडईमध्ये ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. दुकानदारांनी ठेवलेले कोंबडय़ांचे पिंजरे उचलून साफसफाई करण्यात आली. परंतु गेली अनेक वर्षे कचराकुंडीशेजारी साचलेला कचऱ्याचा ढिग आजही तसाच पडून आहे.
मंडईच्या आसपासच्या परिसरात डेंग्युच्या साथीचा प्रदुर्भाव झाला आहे. टोपीवाला लेनमधील एका महिलेला अलीकडेच डेंग्युमुळे प्राण गमवावे लागले आहेत. तसेच या विभागात अनेकांना डेंग्यु झाल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी मंडईत साचलेला हा कचरा तात्काळ हलवावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र दोन विभागांच्या टोलवाटोलवीत हा कचरा तेथेच पडून आहे.