डिजिटल सेवा पुरवठादारांचा मोठा भर हा मनोरंजनात्मक आशयावर आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना विशेषत: टेकसॅव्ही तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गाणी, चित्रपट आणि मोबाइल टीव्ही असा सगळा मनोरंजनविश्वाचा पेटारा एकाच अ‍ॅपमध्ये सॅमसंगने उपलब्ध करून दिला आहे. ‘सॅमसंग’ने ‘क्लब सॅमसंग२.०’ हे नविन अ‍ॅप्लिकेशन लॉंच केले असून ऑफलाइन असतानाही या अ‍ॅपची सेवा ग्राहकांना मिळू शकते, अशी माहिती सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या ‘मीडिया सोल्यूशन्स सेंटर’चे संचालक तरुण मलिक यांनी दिली.
‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’च्या एमएससी (मीडिया सोल्यूशन्स सेंटर) विभागाने ‘क्बल सॅमसंग २.०’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सॅमसंग साऊथ वेस्ट एशियाचे अध्यक्ष बी. डी. पार्क उपस्थित होते. प्रत्येक अ‍ॅप विकसित करताना विशिष्ट ग्राहकवर्ग आमच्या नजरेसमोर असतो. ‘क्लब सॅमसंग २.०’ या अ‍ॅपच्या माध्यमातून मनोरंजनात्मक आशय देण्यामागे जास्तीत जास्त युवावर्गाला ‘सॅमसंग’ पर्यंत आणणे हा आमचा मुख्य उद्देश होता, असे तरुण मलिक यांनी स्पष्ट केले. त्यासाठीच तरुणाईत लोकप्रिय असलेल्या शाहीदला आम्ही अ‍ॅपशी जोडून घेतले, असेही त्यांनी सांगितले. शाहीद आणि श्रध्दा हे दोन्ही कलाकार आजच्या पिढीचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्याकडून हे अ‍ॅप लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘क्लब सॅमसंग २.०’ या अ‍ॅपच्या सहाय्याने विविध भाषांमधील चित्रपट, गाणी, व्हिडिओज यांच्या जोडीला नव्वदहून अधिक वाहिन्या असलेल्या मोबाइल टीव्हीची सुविधा देण्यात आली आहे. हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम अशा विविध प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा आशय या अ‍ॅपमधून मिळणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये हा आशय मिळवता यावा यासाठी अ‍ॅपला एकच प्लेअर देण्यात आला आहे.हा प्लेअर क्लब संॅमसंग अ‍ॅपमधून मिळणाऱ्या मीडिया फाइल्स स्कॅन करून ठेवतो. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरू नसतानाही या अ‍ॅपमधून ग्राहकांना आपल्याला हवी असलेली गाणी आणि इतर गोष्टींचा आनंद घेता येईल, असे मलिक यांनी सांगितले. सध्या हे अ‍ॅप सॅमसंग मोबाइलच्या १४ मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. लवकरच ३३ मॉडेल्समध्ये ही सेवा उपलब्ध होईल. अशाप्रकारे डिजिटल आशय पुरवठा सेवा देणारे सॅमसंगचे हे एकमेव अ‍ॅप असून ‘क्लब सॅमसंग २.०’ ने मोबाइल क्षेत्रात नविन मानक निर्माण केला असल्याचे बी. डी. पार्क यांनी यावेळी सांगितले.