कुपोषणासारखी समस्या दूर करण्यासाठी शासन अधिक निधी खर्च करूनही ही समस्या सुटत नाही. त्याकरिता संशोधनाची खरी गरज आहे. त्यासाठी विद्यापीठे संशोधनाची केंद्रे होणे गरजेचे आहे. तथापि, अलीकडच्या काळात विद्यापीठे आणि संशोधन यांचा संबंध तुटल्याचे दिसते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असून समाजाला भेडसावणारे आरोग्याचे प्रश्न दूर करण्यासाठी विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या समन्वयातून संशोधनाला चालना द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १४वा दीक्षान्त सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते.
विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृहात झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दीक्षान्त सोहळ्याच्या माध्यमातून देश व समाजाच्या सेवेत एक नवीन पिढी दाखल होत असते. यामुळे विद्यापीठांच्या दीक्षान्त सोहळ्यास वेगळे महत्त्व असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. पदवीदान सोहळ्यास सर्व विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. त्याचा संदर्भ घेत त्यांनी दीक्षान्त सोहळ्यात जी शपथ घेतली जाते, पुढे प्रत्यक्ष जीवनात तिचे पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जीवनात हा सोहळा व शपथ याचे पालन आपण किती करतो ते महत्त्वाचे आहे. समाज व्यवस्थेतून निर्माण झालेल्या विद्यापीठाच्या माध्यमातून आज आपणास पदवीची संधी मिळाली आहे. यामुळे समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून डॉक्टरांनी ग्रामीण भागांत तसेच वंचितांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
वित्तमंत्री मुनगंट्टीवार यांनी सामान्यजनांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. सोहळ्यात कुलगुरूंनी विद्यापीठाचे काही आर्थिक विषय प्रलंबित असल्याचा मुद्दा मांडला होता. तो संदर्भ घेऊन वित्तमंत्र्यांनी राज्याची आर्थिक स्थिती कथन केली. महाराष्ट्रावर सध्या तीन लाख कोटींचे कर्ज आहे. व्याजापोटी मोठी रक्कम द्यावी लागते. परंतु, या स्थितीत विद्यापीठास परीक्षा केंद्र इमारत बांधणी व तत्सम कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तावडे यांनी सातत्याने ज्ञान ग्रहण करण्यासाठी डॉक्टरांनी प्राधान्य देण्याची सूचना केली. विविध विद्याशाखांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६२ स्नातकांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यात ३८ मुलींचा समावेश आहे.

सात हजार ४७८ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान
पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या एकूण सात हजार ४७८ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे २७५३, पदव्युत्तर पदवी १५७, दंत वैद्यक विद्याशाखा पदवी ६०८, पदव्युत्तर पदवी ९, आयुर्वेद व युनानी विद्याशाखा पदवी २०२७ विद्यार्थी, तर पदव्युत्तर पदवीचे ७८, होमिओपथी विद्याशाखा पदवी ९१७, पदव्युत्तर पदवी ४६, बी.पी.टी.एच. पदवीचे ३७७, बीओटीएच पदवी ४१ आणि अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
डॉक्टरांना कानपिचक्या
वैद्यकीय पदवी ग्रहण करताना सेवा म्हणून काम करावे अशी अपेक्षा असते. पण, प्रत्यक्षात तसे घडत नाही. दीक्षान्त सोहळ्यात दिली जाणारी शपथही कोणी लक्षात ठेवत नाही, असे मुद्दे मांडत मंत्र्यांनी डॉक्टरांना कानपिचक्या देण्याची संधी सोडली नाही. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समाजाचे देणे लागतो या भावनेतून वंचितांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन केले. पदवी मिळाल्यावर आर्थिक सुबत्तेसाठी प्रयत्न सुरू होतात. परंतु, सेवाभाव मनात ठेवून डॉक्टरांनी काम करावे असे महाजन यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याच मुद्दय़ावर बोट ठेवले.
नाझिम अलमास सईदला ११ सुवर्णपदके
आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ११ सुवर्णपदकेनागपूरच्या जेएमसी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नाझिम अलमास सईदने पटकावली. आई-वडील, पती, भाऊ, काका, मावशी असे सईद कुटुंबांत एकूण सात डॉक्टर आहेत. घरातून आणि शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे यश दृष्टीपथास आल्याने नाझिमने सांगितले. वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा आंतरवासीयता पूर्ण झाल्यानंतर होते. त्यात साडेपाच वर्षांतील अभ्यासक्रमातील १९ विषयांवरील प्रश्न विचारले जातात. प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज तिने व्यक्त केली. ही प्रवेश परीक्षा पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच घेणे आवश्यक आहे. कारण, आंतरवासीयता करताना सर्वाना त्या परीक्षेचा ताण असतो. यामुळे संबंधितांकडून आंतरवासीयतेकडे दुर्लक्ष होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी आधीच प्रवेश परीक्षा पार पडल्यास आंतरवासीयाता मन:पूर्वक केली जाईल, असा विश्वास तिने व्यक्त केला.