ठाणे परिसरातील गेल्या काही निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी पाहिली तर लोकशाहीच्या परीक्षेत येथील जनता अगदीच काठावर पास होत आल्याचे दिसून आले आहे. सरासरी ४० टक्के मतदान येथील शहरी भागांमध्ये दिसून येते. मतदानाबाबतच्या या निरुत्साहात डोंबिवली शहर आघाडीवर असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. एरवी आयुष्यातील इतर खडतर परीक्षांमध्ये नेहमी अव्वल श्रेणीमध्ये यश संपादन करणारी येथील जनता निवडणुकांकडे मात्र मोठय़ा संख्येने पाठ फिरवताना दिसते. विशेष म्हणजे मतदान न करणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकून आपण चुकीच्या उमेदवारांना निवडून येण्यास मदतच करतोय, याचे भान बाळगून यंदा तरी मतदानाचा हक्क वाया जाऊ देऊ नका..
देशभरात सर्वाधिक मतदार असलेला जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील मतदार मताचे दान टाकताना मात्र हात आखडता घेतात, असा आजवरचा अनुभव आहे. सुशिक्षितपणाचा टेंभा मिरवणारी ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमधून लोकसभा निवडणुकीत आजवर ४५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले नाही. २००९ मध्ये तर डोंबिवली शहरातून अवघे ३६ टक्के मतदान झाले होते. मतदानाचे हे मागासलेपण मागे सोडण्याचे मोठे आव्हान यंदा ठाणे, डोंबिवलीकरांना पेलावे लागणार असून २१ व्या शतकातील शहर असे बिरुद मिरविणाऱ्या नवी मुंबईतही हा आकडा वाढणे गरजेचे आहे. त्यामुळे इतकी वर्षे जेमतेम ४०, ४२ टक्क्यांचा आकडा गाठणाऱ्या ठाणे, कल्याण, भिवंडी यांसारख्या मतदारसंघांतील मतदानाचा टक्का गुरुवारी वाढेल का, याविषयी उत्सुकतेचे वातावरण आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईसारखी सुशिक्षित आणि आर्थिक संपन्नता असलेल्या शहरांचा समावेश या जिल्ह्य़ात असला तरी येथील नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग निरुत्साही असा आहे. आजपर्यंत झालेल्या लोकसभेच्या मतदानाला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादावरून हे स्पष्ट होते. देशभरात निवडणूक जागृतीचा प्रयत्न विविध माध्यमांतून झाला आहे. सामाजिक, औद्योगिक संस्था, प्रसार माध्यमे, सोशल मीडिया आणि निवडणूक आयोगाने मतदान वाढावे यासाठी चांगले प्रयत्न केल्याचे दिसून आले. आत्तापर्यंत देशभरात झालेल्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची एकूण टक्केवारी वाढताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्य़ातही काही शहरांमध्ये मतदार जागृतीसाठी तरुणांनी पुढाकार घेतला होता.
इतिहास मागासलेपणाचा
ठाणे जिल्ह्य़ात २००९ मध्ये झालेल्या मतदानामध्ये पालघर मतदारसंघामध्ये जिल्ह्य़ातील सर्वाधिक मतदान ४८.०९ झाले होते. त्या खालोखाल ठाण्यामध्ये ४१.५० तर भिवंडीमध्ये ३९.३९ टक्के मतदान झाले होते. सुशिक्षितांचा मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्य़ात सर्वात कमी मतदान झाले होते. ही टक्केवारी जेमतेम ३४.३० टक्के इतके झाले होते. शाळेमध्ये काठावर पास होण्यासाठी ३५ टक्क्यांची आवश्यकता असते. मात्र कल्याण मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीत पुरता नापास झाला होता. विधानसभानिहाय २००९च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिल्यास शहरातील मतदारांचा त्या वेळीचा निरुत्साह पुरेपूर जाणवतो. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त मतदान कल्याण ग्रामीणमध्ये ३७.३६ झाले होते. तर त्या खालोखाल मुंब्रा-कळव्यात ३६.११ टक्के मतदान होते तर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर डोंबिवली शहराचा नंबर ३६.०५ टक्के घेऊन लागला होता. सर्वात कमी मतदान उल्हासनगरमध्ये २६.४१ झाले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वात जास्त मतदान ठाणे शहरातून ४६.८२ टक्के झाले होते. तर त्यानंतर ऐरोली ४४.३७, बेलापूर ४३.५२ असे मतदान झाले होते. मिरा भाइंदरमध्ये सर्वात कमी केवळ ३३.५८ टक्के मतदान झाले होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वाधिक ४८.०७ टक्के मतदान झाले होते. तर सर्वात कमी भिवंडी पूर्वमध्ये ३०.६७ टक्के मतदान झाले होते. कल्याण पश्चिममध्ये ३४.८६ टक्के मतदान झाले होते. यंदा मागासलेपणाचा हा इतिहास मोडून काढण्याचे आव्हान मतदारांपुढे असेल.

मतदानाची २००९ ची एकूण टक्केवारी
ठाणे – ४१.५०    
कल्याण – ३४.३०               
भिवंडी – ३९.३९  
पालघर – ४८.०९
२००४ मध्ये ठाण्यामध्ये ४०.७८ टक्के  तर डहाणूमध्ये ४२.५७ टक्के मतदान झाले होते.

२००९ मतदारसंघाची विधानसभानिहाय टक्केवारी
कल्याण
अंबरनाथ – ३४.४२
उल्हासनगर – २६.४१
कल्याण पुर्व – ३५.९९
डोंबिवली – ३६.०५
कल्याण ग्रामीण – ३७.३६
मुंब्रा-कळवा- ३६.११

ठाणे
मिरा-भाइंदर – ३३.५८
ओवळा-माजिवाडा – ३८.१२
कोपरी-पाचपाखाडी – ४३.९०
ठाणे – ४६.८२
ऐरोली – ४४.३७
बेलापूर – ४३.५२

भिवंडी
भिवंडी ग्रामीण – ४८.०७
शहापूर – ४६.६९
भिवंडी पश्चिम – ३४.११
भिवंडी पूर्व – ३०.६७
कल्याण पश्चिम – ३४.८६
मुरबाड – ४२.०४