कल्याण-डोंबिवली शहरात चोरटय़ांचा वावर वाढला असून त्यांच्या उपद्रवापुढे पोलीसही हतबल झाल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. व्यापाऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे पोलिसांनी आता या चोरटय़ांच्या बंदोबस्तापुढे खासगी कमांडो तैनात करणे सुरू केले आहे. रामनगर भागातील काही व्यापाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून या भागातील चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १५ कमांडो तैनात केले आहेत. हे कमांडो रात्रीच्या प्रहरात बाजारपेठ परिसरात गस्त घालणार आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हैराण झालेल्या पोलिसांचा भारही यामुळे काही प्रमाणात हलका झाल्याचे चित्र दिसत आहे.
कल्याण-डोंबिवली या दोन शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून या तुलनेत येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे बळ कमी असल्याची ओरड नेहमीच होत असते. त्याचे प्रतिकूल परिणाम आता या भागात दिसू लागले असून गेल्या सहा महिन्यांत घरफोडी, सोनसाखळी चोरी अशा घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तुलनेने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. गेल्या सहा महिन्यांत कल्याण-डोंबिवलीमध्ये घरफोडीच्या १८५ व सोनसाखळी चोरीच्या १५४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी घरफोडीचे ३३ तर सोनसाखळी चोरीचे ५४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या चोरटय़ांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेले नागरिक पोलिसांच्या कामगिरीविषयी फारसे समाधानी नसल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यामध्ये मुबलक पोलीस बळ उपलब्ध नाही, त्यात कामाचा वाढता बोजा, यामुळे सर्वच ठिकाणी लक्ष देता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येते. धूम स्टाइलने गाडय़ा चालवणे, गैरप्रकारात आघाडीवर असणे, अशा तरुणांच्या पालकांना त्यांच्याविषयी माहिती दिली तर त्यांचे पालक पोलिसानाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. तसेच पोलिसांच्या तावडीत सापडू नये, यासाठी चोरटे शहरातील रिकाम्या बेकायदा बांधकामांमध्ये लपण्यासाठी आश्रय घेतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
कमांडोची गस्त
दरम्यान, वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांचा दबाव वाढू लागल्याने पोलिसांनी आता शहरातील काही बाजारपेठ परिसरात खासगी कमांडो तैनात केले आहेत. यासाठी व्यापाऱ्यांनी आर्थिक मदत करण्याचे नक्की केल्यामुळे पोलिसांचा भारही हलका झाला आहे. हे कमांडो रात्रीच्या वेळेत बाजारपेठा, वाहनतळ आदी भागात गस्त घालणार आहेत. या कमांडोच्या जोडीला तीन बीट मार्शल, गुन्हे शाखेचे कर्मचारी तैनात असणार आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी सांगितले.

पोलिसांचे आवाहन
कल्याण-डोंबिवली शहरात दिवस आणि रात्री अशा दोन्ही सत्रांत गस्त वाढवण्यात आली आहे. संशयित ठिकाणी पोलिसांच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली. प्रत्येक सोसायटीने प्रवेशद्वारावर रजिस्टर ठेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवावी. शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे प्रवेशद्वारावर बसवावेत. नवीन भाडेकरू तसेच संश़यित व्यक्ती परिसरात फिरत असेल तर त्याची माहिती पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.