पावसाळ्यामध्ये साथीच्या आजारांच्या प्रादुर्भावासडासाची उत्पत्ती  कारणीभूत ठरत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मात्र या कामात टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी गुरुवारी दिला.
पावसाळ्यात डासांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अजय मेहता यांच्या दालनात गुरुवारी डास प्रतिबंधात्मक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजय देशमुख, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर, विविध शासकीय व निम शासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पावसाळ्यात मुंबईमध्ये डासांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचे गेल्या काही वर्षांत आढळून आले आहे. साथीच्या आजारांचा प्रदुर्भाव होऊ नये यासाठी डासांची पैदास होण्याची ठिकाणी तातडीने नष्ट करावीत. त्यासाठी अन्य यंत्रणांनी पालिकेला आवश्यक ते सहकार्य करावे, अशी सूचना अजय मेहता यांनी शासकीय, निमशासकीय व अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना बैठकीत केली. पालिकेला सहकार्य न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजय मेहता यांनी यावेळी दिला. आपापल्या कार्यक्षेत्रात पाणी साचणार नाही यासाठी आस्थापनांनी काळजी घ्यावी. काही अडचणी असल्यास पालिकेच्या संबंधित खात्याशी त्वरित संपर्क साधावा. पालिकेकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्हाडाने आतापर्यंत केलेल्या डास प्रतिबंधात्मक कारवाईबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.