माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कार्यालयात दहा ते बारा र्वष स्वीय साहाय्यक म्हणून सेवा केलेले कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त शंकर भिसे हे काँग्रेसधार्जीणे आहेत, असा समज असलेल्या काँग्रेस नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात ते राष्ट्रवादी काँग्रेसधार्जीणे असल्याचा साक्षात्कार झाला. मुख्यमंत्र्यांकडे एका उच्चपदस्थ काँग्रेस नेत्याने माजी आयुक्त भिसे यांच्या राजकीय वागणुकीबाबत तक्रार केल्याने त्यांची तडकाफडकी बदली केली असल्याची चर्चा शहरात, मंत्रालयात सुरू झाली आहे.
गेल्या नऊ महिन्यांपूर्वी माजी आयुक्त भिसे यांनी कल्याण- डोंबिवली पालिकेचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकारी, नेते, नगरसेवकांमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी चढाओढ लागली होती. काही नगरसेवकांनी तर त्यांचे ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर स्वागत करून त्यांना कल्याणच्या दिशेने आणले होते. कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मुथा व दत्त असे दोन गट असल्याचे मानले जाते. या गटातटाला भिसे यांनी आपल्या परीने नऊ महिन्यांत सांभाळले.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजी चौकात काँग्रेसच्या एका गटाने प्रचार कार्यालय सुरू केले आहे. दुसऱ्या गटाने अशा कार्यालयाची गरजच काय, असा प्रश्न माजी आयुक्त भिसे यांना केला. हा विषय थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचल्यानंतर भिसे हे राष्ट्रवादी समर्थक असल्याची तक्रार तेथे काँग्रेसच्या एका गटाकडून करण्यात आल्याचे बोलले जाते. दुसऱ्या प्रकरणात, कल्याण लोकसभेचे निवडणूक निरीक्षक आशीष वाच्छानी यांनी कल्याण-डोंबिवली शहरांचा दौरा केल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी बेसुमार अनधिकृत प्रचार फलक लावल्याचे दिसून आले. पालिका अधिकारी आणि राजकीय पक्षांनी संगनमत करून हे प्रचार फलक लावले आहेत. पालिकेच्या आयुक्तांचे या प्रचार फलक व्यवस्थेवर अजिबात नियंत्रण नाही. अशी एक तक्रार निरीक्षकांकडून थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती असे सांगण्यात येते. त्यातच भिसे यांनी आचारसंहिता चालू असताना मार्चमध्ये स्थायी समितीची सभा बोलावून दहा कोटीचे रस्ते कामाचे विषय मंजूर करून घेतले होते. या सगळ्या तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन शासनाच्या माध्यमातून माजी आयुक्त शंकर भिसे यांना बदलीची वाट दाखवली असल्याचे बोलले जाते.
कल्याण-डोंबिवलीत दहा वर्षांपूर्वी आयुक्त असलेले श्रीकांत सिंग नगरविकास विभागात प्रधान सचिव आहेत. त्यांना भिसे यांच्या ढिसाळ कारभाराच्या तक्रारी दररोज पोहचत होत्या. आयुक्ताने आयुक्तासारखे काम करावे या तत्त्वाने काम करणारे प्रधान सचिव श्रीकांत सिंग भिसे यांनाही भिसे यांचा नियोजनशून्य कारभार न पटल्याने भिसे यांना नऊ महिन्यांत पालिका आयुक्तपद सोडावे लागले, असे सूत्राने सांगितले.