कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ (ईपीएफ) अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना किमान एक हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याची योजना यावर्षी एप्रिलपासून लागू करण्यात आली, परंतु या योजनेंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना अद्यापही रक्कम प्राप्त झालेली नाही. देशभरातील २७ लाख निवृत्तीधारक वेतनापासून वंचित आहेत. ऑक्टोबरमध्ये थकित रकमेसह निवृत्ती वेतन मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५ राष्ट्रीय समन्वय समितीचे महासचिव प्रकाश पाठक यांनी दिला आहे.
केंद्र सरकारने यावर्षी एप्रिलपासून ‘ईपीएफ’
 निवृत्ती वेतनधारकांना किमान एक हजार रुपये निवृत्ती वेतन लागू केले आहे. परंतु प्रत्यक्षात अजून वेतनधारकांना ही रक्कम मिळालेली नाही.
ईपीएफच्या मुख्यालयातून काही निर्देश अद्याप देण्यात न आल्यामुळेच ही रक्कम मिळण्यास विलंब होत आहे. ईपीओच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या
सहायक भविष्य निधी आयुक्तांनी समितीला पत्र दिले आहे.
ज्येष्ठ निवृत्ती वेतनधारकांना थकित रकमेसह वेतन द्यावे, अशी मागणी ईपीएफ ९५ राष्ट्रीय समन्वय समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार मंत्री तोमर, कामगार मंत्रालयाचे प्रधान सचिव, मुख्य भविष्य निधी आयुक्त, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सदस्यांना सात हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याबाबत २०११ मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती.
केंद्र सरकारने भगतसिंग कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही समितीने निवेदनातून केली आहे. ऑक्टोबरमध्ये थकित रकमेसह निवृत्ती वेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा समितीचे महासचिव पाठक यांनी दिला आहे.