पक्षी संशोधन आणि अभ्यासात आघाडीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय बर्डलाईप इंटरनॅशनल, रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वाईल्ड सीईआर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सलग वर्षभर सामान्य पक्षी निरीक्षण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पक्ष्यांची संख्या व त्यांची जीवनशैली यांचा साध्या व सुलभ पद्धतीने अभ्यास करण्याची संधी मिळेल.
या प्रकल्पाकरिता शहराच्या ३० किलोमीटरच्या क्षेत्रात दोन किलोमीटरचे ७६४ चौरस बनविले आहेत. पक्षी निरीक्षकांना त्यांना दिल्या गेलेल्या चौरसामध्ये वर्षभरात केवळ तीनदा पक्षी निरीक्षण करावयाचे आहे. पक्षी निरीक्षण करताना ठराविक ट्रान्सेक्टवर चालताना बघितले वा ऐकलेल्या पक्ष्यांची नोंद करायची आहे, असे वाईल्ड सीईआरचे अध्यक्ष डॉ. बहार बाविस्कर यांनी सांगितले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सामान्य पक्षी निरीक्षण प्रकल्पाचे नंदकिशोर दुधे म्हणाले, या प्रकल्पामुळे पक्ष्यांच्या अधिवासानुसार त्यांच्या संख्येत वर्षभरात आणि वर्षांनुवष्रे होणारे बदल अभ्यासता येतील. तसेच या प्रकल्पामुळे पक्ष्यांच्या जीवनशैलीत होणारे बदलदेखील अभ्यासता येतील. वाईल्ड सीईआरतर्फे सामान्य पक्षी निरीक्षण प्रकल्पाचे समन्वयक समीर शेंद्रे आणि शुभम पाटील यांनी सांगितले की ‘ाा प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंसेवक आणि पक्षी मित्रांच्या मदतीने पक्षी संवर्धन या संस्थेच्या कार्याला बळकटी मिळेल. पक्षी निरीक्षण येत्या २६ एप्रिलला सकाळी ७ ते ९ दरम्यान करण्यात येणार आहे. सामान्य पक्षी निरीक्षण प्रकल्पात सहभागी होण्यास इच्छुक पक्षीमित्रांनी ९७६६६७६००५, ८८०५६७१७३४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले.