एका वयोवृद्ध दिग्गज कलावंताने दुसऱ्या क्षेत्रातील दिग्गज कलावंताला दूरध्वनी करून बोलण्याची इच्छा व्यक्त करावी.. ही दुर्मीळ आणि अचंबा वाटेल अशी बाब. परंतु, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक आणि दिग्गज संगीतकार पं. रवी शंकर कॅलिफोर्नियात वास्तव्यास असून आजारी आहेत. गुरुवारी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अशा दिग्गज आणि ऋषीतुल्य बुजूर्ग कलावंताने आजारी असताना आपल्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करावी आणि दूरध्वनीवरून संवाद साधावा हा माझ्या आयुष्यातील अतिशय हृद्य आणि अविस्मरणीय क्षण आहे, बॉलीवूड शहनशहा अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगवरून ही माहिती दिली आहे.
बिग बी पुढे ब्लॉगमध्ये लिहितो की, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रथमच दिग्गज सतारवादक पं. रवी शंकर यांच्या निवासस्थानाहून त्यांच्या पत्नी सुकन्याजी यांचा फोन आला आणि माझ्याशी बोलण्याची इच्छा पंडितजींनी व्यक्त केल्याचे त्या म्हणाल्या.  पंडितजी आजारी आहेत आणि त्यांच्यावर गुरुवारी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सहसा कधीही न घडणारी गोष्ट माझ्या बाबतीत घडली असे मी मानतो. पंडितजींना अनेक प्रसंगी मी भेटलो आहे. माझ्या वडिलांसोबत त्यांची चांगली ओळख होती, त्यांच्या भेटीगाठीही व्हायच्या. आमच्या कुटुंबाचे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि ख्यातनाम नर्तक उदय शकंर यांचे घनिष्ठ संबंध होते. उदय शंकरजी यांच्या अभिनेत्री कन्येशीही माझा चांगला संबंध आहे. परंतु, अशा दिग्गज कलावंताने माझ्याशी बोलण्याची इच्छा प्रदर्शित करावी हे माझे भाग्यच होय, असेही अमिताभने आवर्जून नमूद केले आहे. मी पंडितजींच्या अनेक मैफली कोलकात्यात असताना ऐकल्या आहेत. उदय शंकर, आनंदा शंकर आणि शंकर कुटूंबातील अनेकांशी माझा जवळचा संबंध आहे.
भारतीय संगीतातील या दिग्गज, ऋषीतुल्य कलावंताने माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करावी ही खरोखरीच माझ्यासाठी मोलाची घटना होय. ते माझ्याशी बोलले. पंडित रवी शंकरजी म्हणाले की, त्यांना आणि त्यांच्या पत्नी सुकन्याजी यांना माझे काम खूप आवडते. नंतर त्यांनी मला आशीर्वाद दिले.. मी धन्य झालो, अशा शब्दांत अमिताभने ब्लॉगवर लिहिले आहे.