जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित लोकशाही दिनात न्याय्य मागण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. या वेळी संबंधितास तातडीने वैद्यकीय उपचार
 मिळाला नसल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता लोकशाही दिनाचे कामकाज सुरू झाले. शासकीय विभाग आणि इतर काही प्रश्नांबाबत नागरिक या ठिकाणी दाद मागू शकतात. त्यानुसार सिडकोतील पाटीलनगर भागात वास्तव्यास असलेल्या शरदचंद्र धोडपकर (६५) यांची घराशेजारील कांडप यंत्राबाबत तक्रार होती. या कांडप यंत्राच्या हादऱ्यांमुळे आपल्या घराच्या भिंतींना तडे जातात. यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार करण्यासाठी ते आले होते. दालनाबाहेर तक्रार देण्यासाठी सर्व तक्रारदार रांगेत खुर्चीवर बसतात. या ठिकाणी धोडपकर बसले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. खुर्चीवर ते त्याच अवस्थेत बसून राहिले. ही बाब काही जणांच्या निदर्शनास आली. दरम्यानच्या काळात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नानकर या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ग्रामीण पोलीस दलाच्या एका अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांच्या मोटारीतून धोडपकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे लोकशाही दिनाचे कामकाजही थांबविण्यात आले. दोन ते तीन तक्रारदारांनंतर धोडपकर यांचा क्रमांक होता. दालनाबाहेर ही घटना घडल्याचे पालवे यांनी सांगितले.
दरम्यान, हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर धोडपकर यांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळाला नसल्याची तक्रार सामाजिक कार्यर्ते राजेंद्र नानकर यांनी केली. वेळीच उपचार मिळाले
असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, असेही नानकर
यांनी सांगितले. धक्का बसल्यानंतर काही वेळ धोडपकर यांच्याकडे कोणी लक्ष दिले नसल्याचा आरोपही नानकर यांनी केला.