पनवेल शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, त्यावर मात करण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना महावितरण कंपनीकडे अद्याप आखलेली नाही. दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु ती झाल्यानंतर वीज खंडित होणारच नाही याबाबत खात्री देता येत नाही, असे कंपनीकडून सांगितले जात असल्याने ग्राहकांमध्ये कंपनीविरुद्ध असंतोष खदखदत आहे.
पनवेल शहरात एकूण ७७ हजार वीज ग्राहक आहेत. घरगुती व वाणिज्य वापरासाठी असलेले हे वीजग्राहक महिन्याला सुमारे आठ कोटी रुपयांची वीज बिले वेळीच महावितरण कंपनीकडे अदा करतात. मात्र या विजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नाही.  दिवसातून तीन ते चार वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. पनवेल येथील कफनगर आणि परिसरातील हर्षनीती, विनायक, तुलसीधाम, संघमित्रा, वरद, पारिजात, वक्रतुंड या सोसायटय़ांसह पनवेल शहरातील मुख्य बाजारपेठेत वारंवार वीज खंडित होण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी तीन वेळा  वीजप्रवाह खंडित झाला होता. याकडेही ग्राहकांनी लक्ष वेधले आहे.
दर मंगळवारी विजेच्या दुरुस्तीचे कारण सांगून दिवसातून आठ तास वीजपुरवठा बंद केला जातो. गेल्या चार वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. तरीही ही समस्या सुटलेली नाही. तांत्रिक व जुनाट यंत्रणा असल्याचे कारण सांगून अधिकारी वेळ मारून नेण्याचे काम करतात. सततच्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे शहरात मात्र, इन्व्हर्टरचा धंदा तेजीत आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रथमेश सोमण व भाजपचे युवा मोर्चाचे विक्रांत पाटील यांनी महावितरण कंपनीला अनेक वेळा निवेदने दिली आहेत, परंतु समस्या काही कमी झालेली नाही.  नवीन वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची धडपड पाहायला मिळते. त्यामधून होणाऱ्या आर्थिक उत्पन्नामुळे महावितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी स्वत:ची बदली पनवेलमध्ये करून घेतली आहे. तर काही जुने अभियंते पनवेलमधून जाण्यास तयार होत नाहीत, असे येथे सांगितले जाते. हीच धडपड दुरुस्तीची कामे व जुनी वीज यंत्रणा बदलण्याच्या कामी तसेच नवीन कामांसाठी केल्यास पनवेलकरांना अखंडित वीज मिळेल, अशी अपेक्षा पनवेलकरांची आहे.

मीटर जोडणी सरकारी दरानेच
पनवेल शहरातील खंडित वीजप्रवाहाची समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. महावितरण कंपनीच्या साहायक अभियंत्यांपासून ते उपकार्यकारी अभियंत्यांना दुरुस्तीची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकच्या पावसामुळे वीजप्रवाह खंडित होतो. त्याप्रमाणे त्याच्या दुरुस्तीचे कामही करण्यात येते. पनवेल शहरातील कफनगर येथील रोहित्राचे काम सुरू आहे. लवकरच तेही पूर्ण होईल व तेथील वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होईल, अशी आशा आहे. वीजपुरवठा ही तांत्रिक बाब आहे. त्यामुळे पूर्णपणे अखंडित वीज देण्याबाबत खात्री देता येणार नाही. कोणताही भ्रष्टाचार नवीन वीजमीटर जोडणीत होत नाही. सामान्य वीजग्राहकांनी थेट महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधल्यास सरकारी दराने त्यांना वीज जोडणी देता येईल.
– डी. बी. गोसावी, कार्यकारी अभियंता,
वीज महावितरण कंपनी