मान्सून लवकर येण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे त्वरित पूर्ण करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिले.
शुक्रवारी बांधकाम भवन येथे केंद्रीय समितीने सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीस पोलीस गृहनिर्माण संस्थेचे महासंचालक अरुण पटनाईक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करी, महिला व बालविकास संचालक वंदना कृष्णा, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस विशेष महानिरीक्षक जे. जे. सिंग, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथ, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावर आदी उपस्थित होते.
 या वेळी कुलकर्णी यांनी केंद्रीय समितीने रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य, साधुग्राम निर्मिती आदी विविध कामांचा आढावा घेतल्याचे नमूद केले. शासकीय रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम वेळेपूर्वी पूर्ण करण्यासाठी अधिक साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचा वापर करावा अशी सूचना त्यांनी केली. घोटी, इगतपुरी आणि हरसुल येथील ग्रामीण रुग्णालयातही आवश्यक दुरुस्तीचे काम त्वरित करण्याचे तसेच कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर मेळ्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे असे आदेश त्यांनी दिले. रेल्वेच्या नियोजनाबाबत मुंबई येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे.
भाविकांच्या सुविधेसाठी रेल्वे स्थानकातील कामांची माहिती
घेण्यासाठी केंद्रीय समिती नाशिक आणि लगतच्या स्थानकांची पाहणी करेल अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.