जिल्ह्य़ातील अनुदानित शाळांमध्ये केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या ‘इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी इन स्कुल (आयसीटी) या योजनेतंर्गत कार्यरत संगणक शिक्षकांना या योजनेची शासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याने विविध गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. आयसीटी शिक्षकांन्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सर्वश्रमीक महासंघाने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

आयसीटी शिक्षकांना १० हजार रूपये वेतन नमूद असून कंपन्यांकडून मात्र निम्म्यापेक्षा कमी वेतन दिले जाते. भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि कामगारांसाठी असलेल्या रूग्णालय (इएसआयसी) सारख्या सुविधांच्या नावाखाली नमूद वेतनातून कपात केली जाते, असा आरोप निवेदनात करण्यात आला असून ही शिक्षकांसह शासनाचीही फसवणूक असल्याचे म्हटले आहे. शासनाने शिक्षकांना प्रोत्साहीत करण्यासाठी एक कोटी ४० लाखाची तरतूद केली असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. उलट प्रत्येक महिन्याच्या बैठकीसाठी शिक्षकांना उपाशीपोटी कित्येक तास ताटकळत बसावे लागते. कंपनी प्रशासनाकडून शिक्षकांना या प्रकारांविषयी वाच्यता केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. शासनाने सुमारे ५० लाख रुपयांची तरतूद प्रत्येक जिल्ह्य़ाला ‘मास्टर लॅब’ बनविण्यासाठी केली असली तरी नाशिक जिल्ह्य़ात कार्यरत असणाऱ्या ‘एज्युकॉम्प सोल्यूशन’ तसेच आय.एल. आणि एफ.एस. या कंपन्यांनी नमूद बाबींची पूर्तता केलेली नाही. संगणक कक्षात नमूद अनेक गोष्टी संगणक कक्षात उपलब्ध नसल्याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनात महासंघाने संगणक शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह काही मागण्याही मांडल्या आहेत. कंपन्या शासनाने नमूद केलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करत असून या प्रकाराची चौकशी करून दोषी कंपन्यांचे काम बंद करावे, दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, संगणक शिक्षकांना पद निर्मिती करून कायम सेवेत समाविष्ट करावे, संगणक शिक्षकांना कराराप्रमाणे समान वेतन द्यावे, वेतन पावती द्यावी, वेतनातून कपात केलेली भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कंपनीच्या सहभागासह खात्यात जमा करावी, कंपन्यांनी शासनाशी केलेल्या ‘सव्‍‌र्हिस लेव्हल अ‍ॅग्रीमेंट’नुसार वेतनात दरवर्षी पगार वाढ देण्यात यावी, संगणक शिक्षकांना इएसआयसी योजनेचा लाभ द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन आ. डॉ. राहुल आहेर यांनाही देण्यात आले आहे. निवेदनावर महासंघाचे जिल्हाध्यक्ष सागर आहेर यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.