मुंबई पोलिसांना संगणकाचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या हस्ते या उपक्रमाचा आरंभ झाला. ‘वेदांत फाऊंडेशन’तर्फे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणे तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी लंडनच्या ‘वेदांत पीएलसी रिसोर्सेस’च्या वेदांत फाऊंडेशनने हा विनामूल्य उपक्रम सुरू केला आहे. वरळी पोलीस ठाण्यात पहिल्या संगणक केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि त्यांच्या पत्नी प्रीती मारिया यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
मरोळ, माहीम आदी ठिकाणीही ‘वेदांत’तर्फे पोलिसांसाठी संगणक केंद्रे उभारली जाणार आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांना आणि मुलांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवून त्यांना व्यवसायासाठी मदत केली जाणार आहे. यावेळी ‘वेदांत’च्या विश्वस्त सुमन दिदवानिया आणि मुख्य कार्यकारी संचालिका लोना नायक आदी उपस्थित होते. पोलिसांसाठी अशा प्रकारचा उपक्रम सुरू केल्याबद्दल पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी संस्थेचे आभार मानले.