घोडबंदर मार्गालगत असलेल्या गायमुख खाडीकिनारी पर्यटन स्थळ उभारण्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हिरवा कंदील दाखविला असला तरी या भागातून जलवाहतूक तसेच बोटिंग सुरू करण्यास येथील रेती व्यावसायिकांनी तसेच डुबकी मारून रेती काढणाऱ्या काही ग्रामस्थांनी विरोध केल्याने पर्यटन केंद्राच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे. या खाडीकिनारी जेट्टी, गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधी करण्यासाठी सभागृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. त्यासाठी सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. असे असले तरी पर्यटन केंद्र म्हणून या सगळ्या परिसराचा विकास करायचा असेल तर दशक्रिया विधी सभागृहापेक्षा बोटिंग तसेच जलवाहतूक सुरू करण्याला अधिक महत्त्व आहे. मात्र रेती व्यावसायिकांच्या एका मोठय़ा गटाकडून त्यास जोरदार विरोध सुरू असल्याने या पर्यटन केंद्राचे भवितव्य धोक्यात आले आहे.
ठाण्याच्या घोडबंदर बाजूकडे विस्तीर्ण असा खाडीकिनारा असून गायमुख भागात या खाडीचे मनोहारी रूपाचे दर्शन होत असते. हा सगळा परिसर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या हद्दीत येत असल्याने या भागात एखादे पर्यटन केंद्र विकसित करावे, असा प्रस्ताव बोर्डाने राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे सादर केला होता. या केंद्राच्या विकासासाठी सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूद करून त्यासंबंधीचे अंदाजपत्रकही पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आले आहे. या प्रस्तावास महामंडळाने हिरवा कंदील दाखविताच खर्चाचा भार महापालिकेने उचलावा असा प्रस्ताव पुढे आला. गायमुखचा परिसर ठाणे, मीरा-भाईंदर, वसई यासारख्या शहरांसाठी मध्यवर्ती भागात असल्याने या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित झाल्यास येथील रहिवाशांना त्याचा उपयोग करून घेता येईल. तसेच ठाणे शहरापासून हे केंद्र फारच जवळ असल्याने महापालिकेने यासंबंधीचा आर्थिक भार उचलण्याची तयारी ठेवावी, असा आग्रह धरण्यात आला. महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी आग्रह धरताच यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेत संमत करण्यात आला.
बोटिंग, जलवाहतूक अंधातरी
पर्यटन केंद्राच्या विकासासाठी आवश्यक अशा सुविधा या ठिकाणी विकसित करण्याचे मोठे आव्हान महापालिका आणि पर्यटन विकास महामंडळापुढे उभे राहिले आहे. या भागात बोटिंग तसेच जलवाहतूक सुरू करण्यास वाव असल्याचा अहवाल यापूर्वीच महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने सादर केला आहे. हे दोन प्रकल्प सुरू झाल्यास या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित होऊ शकणार आहे. असे असताना या भागात वर्षांनुवर्षे रेती उपसा करणाऱ्या व्यावसायिकांनी मात्र बोटिंग सुरू करण्यास जोरदार विरोध सुरु केल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे. गायमुख खाडीत डुबकी मारून रेती काढण्याचा येथील ग्रामस्थांचा पारंपरिक व्यवसाय आहे. बोटिंगमुळे आपला वडीलोपाíजत व्यवसाय बंद होईल, अशी भीती येथील ग्रामस्थांना वाटू लागली आहे. ग्रामस्थांच्या एका मोठय़ा गटाचा विरोध लक्षात घेता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने सौम्य भूमिका घेण्याचे ठरविले आहे. बोटिंग तसेच जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे, अशी माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी वृत्तान्तला दिली. तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
तूर्तास दशक्रिया विधी
पर्यटन केंद्राच्या नावाने मोठा गाजावाजा करत प्रस्ताव तयार केला जात असताना ग्रामस्थांच्या विरोधामुळे पहिल्या टप्प्यात या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी सभागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जेटी, गणेश विसर्जन घाट यासारखी कामेही केली जाणार आहे. पर्यटन केंद्राच्या नावाने प्रस्ताव तयार करायचा आणि प्रत्यक्षात दशक्रिया विधीचे सभागृह बांधायचे, असा हास्यास्पद प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया आता महापालिका वर्तुळात उमटू लागली आहे.