लोकसभा निवडणुका होत नाही तोच महापालिकेच्या झोन सभापती निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना एकत्र आले असून झोन क्रमांक एकमध्ये भाजपचे रवी गुरनुले, दोनमध्ये कॉंग्रेसच्या मीना खनके, तर तीनमधून शिवसेनेचे विनय जोगेकर यांची अविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला दूर ठेवले आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या तीन झोनच्या सभापदीपदासाठी आज, २१ एप्रिलला रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यमान सभापती जयस्वाल, अनिता कथडे व अनिल रामटेके यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही निवडणूक घेण्यात आली. झोन क्रमांक एकसाठी कॉंग्रेसकडून सकीना अन्सारी, अपक्ष एस्तरा शिरवार, शिवसेनेच्या योगिता मडावी व भाजपचे रवी गुरनुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,. तर झोन क्रमांक दोनमधून कॉंग्रेसच्या मीना खनके, मेहर दत्तू सिडाम व भाजपच्या माधुरी बुरडकर यांनी, तर झोन क्रमांक तीनमधून कॉंग्रेसच्या सुनिता अग्रवाल, राजेश रेवल्लीवार, शिवसेनेचे विनय जोगेकर व भाजपच्या ललीता गराटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत नाही तोच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेने एकत्र येऊन राष्ट्रवादीला दूर सारले. यात झोन क्रमांक एकमध्ये कॉंग्रेसचे वर्चस्व असतांना सुध्दा केवळ भाजपला मदत म्हणून रवी गुरनुले यांची निवड करण्यात आली, तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये मीना खनके यांची अविरोध निवड करण्यात आली. झोन क्रमांक तीनमध्ये शिवसेनेचे विनय जोगेकर विजयी झाले. झोन सभापतीची निवडणूक बघता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय वैद्य जळगाव येथे लोकसभेच्या प्रचारासाठी निघून गेले.