उपराजधानीतील गुन्हेगारीने कळस गाठला असताना व यावरून फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठलेली असताना येथील काँग्रेसचे नेते मात्र कमालीचे शांत आहेत. या पराभूत नेत्यांना विरोधकाच्या भूमिकेत शिरायचे नाही की देवेंद्र फडणवीसांना सांभाळून घ्यायचे आहे, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
या शहरातील गुन्हेगारी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. रोज घडणाऱ्या हिंसक घटनांनी सामान्य जनतेचा जीव गुदमरू लागला आहे. राज्यात भाजप सेनेचे सरकार येण्याआधीही येथे गुंडांचा हैदोस होताच, नवे सरकार आल्यावर त्यात घट होण्याऐवजी वाढ झाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भरपूर टीकेला सामोरे जावे लागले. गृहमंत्रालय सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वत:चे शहर सांभाळता येत नाही, अशी बोचरी टीकाही झाली. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी या शहराची संभावना गुन्हेगारांची राजधानी या शब्दात केली. एकूणच या गुन्हेगारीवरून राज्यभर गदारोळ उठलेला असताना विरोधकाची भूमिका बजावण्याची संधी असलेले येथील काँग्रेसचे नेते मात्र कमालीचे शांत आहेत. माजी खासदार, माजी मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील नेते, नगरसेवक हे सारे प्रमुख नेते या मुद्दय़ावर अजून बोललेले नाहीत.
या शहरात अपयशी ठरलेले व नुकतेच बदली झालेले पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची नेमणूक काँग्रेसच्या कार्यकाळात येथे झाली होती. आपल्याच पक्षाचे सरकार असताना पाठकांना नेमले गेले त्यामुळे त्यांच्यावर टीका कशी करायची, असा प्रश्न तर या काँग्रेसच्या नेत्यांना पडला नसावा ना, अशी शंका सुरुवातीला घेतली गेली, पण त्यातही फारसे तथ्य नव्हते. एकटय़ा पाठकांमुळे येथील गुन्हेगारी वाढली असा तर्क काढणे अतिशयोक्ती ठरेल. ही गुन्हेगारी रोखण्यात सरकारला अपयश आले असा पवित्रा काँग्रेसच्या या नेत्यांना सहज घेता आला असता व त्यावरून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य करता आले असते, पण तेही करण्याचे धाडस या नेत्यांनी दाखवले नाही. उलट हा गुन्हेगारीचा विषय हाती घेत पराभूत मानसिकतेतून बाहेर येण्याची चांगली संधी काँग्रेस नेत्यांना प्राप्त झाली होती. मात्र त्याचा फायदा या नेत्यांनी उचलला नाही. या नेत्यांना गुन्हेगारीच्या मुद्दय़ावर बोलण्याची भीती वाटते की त्यांना फडणवीसांना नाराज करायचे नाही अशा शंका सध्या राजकीय वर्तुळात फिरू लागल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर राजकारण करताना विरोधकांना कधीच थेट लक्ष्य केले नाही. विरोधकांना हाताळण्यासाठी त्यांनी अतिशय खुबीने समर्थकांचा वापर केला. स्थानिक मुद्दय़ावर फारसे बोलायचेच नाही अशीच त्यांची आजवरची भूमिका राहिली. त्याची परतफेड म्हणून तर आता काँग्रेस नेते गप्प आहेत का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
राज्याचा मुख्यमंत्री या शहरातला आहे. त्यांच्यावर टीका करून उगीच दुखावण्यापेक्षा त्यांच्याकडून काही कामे करून घेता आली तर उत्तम, असा विचार तर ही नेतेमंडळी करीत नाही ना, अशीही शंका आता घेतली जाते. गुन्हेगारीचा मुद्दा हा थेट जनतेच्या भावनांना हात घालणारा असतो. याची जाणीव असूनही काँग्रेसचे नेते सत्ताधाऱ्यांना पुढे चाल देत असल्याचे दुर्मीळ चित्र या शहरात प्रथमच दिसून आले. आता टीका करण्याऐवजी शांत बसणारे हेच काँग्रेसचे नेते त्यांची सत्ता असतानाच्या काळात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला गुन्हेगारीच्या मुद्दय़ावरून सतत जाहीरपणे टोचणी द्यायचे, गुन्हे वाढले की करा आबा पाटलांना लक्ष्य, असाच या नेत्यांचा कार्यक्रम होता. आता आबा नाहीत आणि पक्षाची सत्ताही नाही तरीही ही नेतेमंडळी तोंडाला का कुलूप लावून बसली आहे हे अनेकांना कळायला मार्ग नाही.
येथील सक्रिय गुंडांना राजकीय पाठबळ आहे. या पाठबळाचे स्वरूप सर्वपक्षीय आहे. भाजप-काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडे पोसलेल्या गुंडांची फौज आहे. या सर्वपक्षीय स्वरूपामुळे काँग्रेस नेते गप्प आहेत का? तसे असेल तर या गुंडगिरीमुळे त्रस्त असलेल्या जनतेने आशेने बघायचे तरी कुणाकडे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मराठवाडय़ातले धनंजय मुंडे येथील गुन्हेगारीवर बोलतात, पण विदर्भातले व त्यातल्या त्यात या शहरातले विरोधक बोलत नाही हे चित्र निराशादायी आहे. मुंडेंनी विरोधी पक्षनेता म्हणून कर्तव्ये पार पाडले असेल, पण त्यांना साथ देण्याची धमक स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दाखवू नये हे अतिच झाले.
एकूणच मुख्यमंत्री फडणवीस खरे सुखात आहेत. विधिमंडळातही त्यांना फारसा विरोध होत नाही आणि स्थानिक पातळीवर तर विरोध नावालाही उरलेला नाही. त्यामुळे भाजपच्या वर्तुळात आनंद आहे.