..आणि भाजप पदाधिकारी अडचणीत
लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सावरत नाही तोच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातील दोन ज्येष्ठ नेत्यांनी एकाच दिवशी पक्ष सोडणे ही आघाडीसाठी मोठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात असतानाच या दोन्ही नेत्यांचे समर्थक व कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये चिंतेचे तर दुसरीकडे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तथापि, नवीन नेते पक्षात येत असल्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना मात्र ते अडचणीचे ठरणार असल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीतून दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे एकेमकांवर खापर फोडणे सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्यासह त्यांचे चिंरजीव सागर आणि समीर मेघे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर लगेच रात्री शरद पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गिरीश गांधी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊन पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविला. या दोन मोठय़ा नेत्यांच्या पक्ष सोडण्यामुळे त्यांच्या पक्षातील वरिष्ठांना काही फरक पडत नसल्याचे बोलत असले तरी स्थानिक कार्यकत्यार्ंमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात दुखावलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असून वेळ आल्यास आमची भूमिका स्पष्ट करू असे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजप नेत्यांच्या संपर्कात असताना त्यांना थांबविण्यासाठी काँग्रेसमध्ये काही वरिष्ठांना जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. दत्ता मेघे आणि गिरीश गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असून लवकरच ते या बाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सध्या सध्या ज्येष्ठ चिरंजिव भाजपमध्ये असून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयारी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असताना नागपुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत हेवेदावे चव्हाटय़ावर येणे सुरू झाले आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने एकीचे प्रदर्शन घडवून राजकीय मोर्चेबांधणीत सध्यातरी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. असे असले तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने पक्षातील काही पदाधिकारी आणि उमेदवारी मिळविण्यात इच्छुक असलेले मात्र सध्या बाहेरच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊ नका, अशा भूमिकेत आहेत. त्यांच्या दृष्टीने ते अडचणींचे ठरणार आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या नेत्यांना कुठलेही पद किंवा उमेदवारी देण्याबाबत आश्वासन न देता प्रवेश द्यावा या भूमिकेवर शहरातील काही पदाधिकारी असून ते वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांना पश्चिम नागपुरातून तर गिरीश गांधी यांचे चिरंजिव निशांत गांधी यांना वरुड-मोशी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोघांना उमेदवारी दिली तर गेल्या अनेक वर्षांंपासून भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकत्यार्ंचे काय? अशी चर्चा भाजपमध्ये आहे. गिरीश गांधी यांनी पुढची दिशा स्पष्ट केली नसली तरी भाजपमध्ये ते प्रवेश करणार हे निश्चित आहे. गिरीश गांधी यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा विचार केला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, गिरीश गांधी पक्षाचे ज्येष्ठ नेते असून विविध क्षेत्रात त्यांचे काम आहे. पक्षाच्या प्रारंभीपासून ते जुळले असल्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे कार्यकत्यार्ंवर आणि पक्षावर नक्कीच परिणाम होणार आहे. मात्र, त्यातून आम्ही बाहेर पडू आणि संघटना मजबूत करू. गांधी यांच्याशिवाय पक्षाचा कुठलाही नेता पक्ष सोडून जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.