गेल्या दोन दशकापासून जिल्ह्य़ातून काँग्रेसला मतदारांनी हद्दपार केले तरी अजूनही काँग्रेस नेते त्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाहीत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यावरही काँग्रेस नेते अजूनही झोपेतच आहेत. दिल्लीवरून कोणीतरी येईल व आपली अवस्था सुधारून जाईल, अशा काहीशा स्वप्नात स्थानिक काँग्रेसजन आहेत. पक्षातील अनेकांना हा पक्ष आपल्याच हातात राहावा, असेच वाटत असल्याने नाराजांची संख्या वाढती आहे. त्यांना कसे राजी करणार व पक्षकार्याला जुंपणार, हा काँग्रेस समोर मोठा यक्षप्रश्न आहे.
काँग्रेस नेत्यांनी जिल्ह्य़ात काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी आता पक्षातच मोठे फेरबदल करणे आवश्यक ठरले आहे. तेच ते चेहरे कामाचे राहिले नाहीत व त्यासाठी काही कालावधी हा पक्ष बळकट करण्यासाठीच घालवावा लागेल. काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी तसे बोलून तर दाखविले, पण खरे तसे होईल काय, हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जे उमेदवार दिले त्यांचा निवडणुकीपूर्वी कधी लोकांशी फार संबंध राहिलेला नाही. लोकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी काँग्रेसला आता जनसंघाप्रमाणे कार्य करावे लागेल. कारण, काँग्रेसची अवस्था एकेकाळच्या जनसंघाप्रमाणेच झाली आहे. जिल्ह्य़ाबाहेरचेच नेते व विशेषत: यवतमाळ, नांदेड व परभणीचे राजकारण करणारे नेते अकोल्याच्या काँग्रेसचे भवितव्य नेहमी ठरवितात, अशी ज्येष्ठ काँग्रेसजनांची व्यक्तिगत पातळीवर होणारी चर्चा हेच दर्शविते की, जिल्हा काँग्रेस तेवढी मजबूत नाही. केंद्र व राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना लोकांसाठी काहीच काम झाले नाही, अशी लोकांची तीव्र नाराजी होती, अशी कबुली काँग्रेस नेत्यांनी दिली, तर प्रकाश आंबेडकरांमुळे धर्मनिरपेक्ष मते विभागली जात असल्याने काँग्रेसला नेहमीच नुकसान होत असल्याचा आरोप हे नेते करीत आहेत.
सत्ता गेली की चांगले चांगले नेते पक्षाविरुद्ध काम करतात, याचे प्रत्यंतर काँग्रेसमध्ये यावेळी प्रकर्षांने दिसून आले. येथील एक वजनदार काँग्रेस नेते के.ना.उर्फ बाबासाहेब धाबेकर यांना काँग्रेसने आमदार केले होते, तसेच ते अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. थोडक्यात, काँग्रेसने त्यांना बरेच काही दिले, पण काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे या निवडणुकीत त्यांनी चक्क काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. ही बाब मान्य सुद्धा केली. कारंजात त्यांनी भाजपा उमेदवाराला पाठिंब्याची घोषणा केली, तर बाळापूरमध्ये बंडखोर काँग्रेस उमेदवार नारायणराव गव्हाणकर यांना सहाय्य केले. दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पराजित झाला. काँग्रेसमध्ये असे अनेक घटक आहेत की, जे केवळ आपल्याच पुरते पाहतात व आतातर सत्ताहीन झाल्यामुळे त्यांच्या आकांक्षाही धुळीस मिळत आहेत. जिल्ह्य़ात काँग्रेस नेत्यांमध्ये कोठेही एकजिनसीपणा दिसून आला नाही. त्यामुळे काँग्रेसला पराजय पहावा लागला. हिंदुत्वाला शिव्या देऊन व अयोध्येतच वादग्रस्त मशिद बांधू, या काँग्रेसी नेत्यांच्या घोषणाबाजीने एकेकाळचा फार मोठा मतदार काँग्रेसपासून दुरावला व त्याचे दुष्परिणाम काँग्रेस भोगत आहे.